
महाराष्ट्रात सध्या कायद्याचे राज्य आहे की बिहारसारखी जंगलराज सुरू आहे, असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ लातूरच्या राजकारणाने आणली आहे. निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना सुनील चौधरी यांचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्यांना चक्क 20 गाड्यांच्या ताफ्यात आणून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे लातूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपने सत्तेचा आणि दहशतीचा गैरवापर करून लोकशाहीचा गळा आवळल्याची टीका होत आहे.
तांबाळा गट हा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. या गटातून काँग्रेसने अंजना चौधरी यांना मैदानात उतरवले होते. मात्र, शनिवारी सायंकाळी उदगीर येथील एका हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातून काही अज्ञात गुंडांनी त्यांचे जबरदस्तीने अपहरण केले. याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही नोंदवली होती. मात्र, आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी जे नाट्य घडले, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
20 गाड्यांचा ताफा आणि बळजबरीने माघार
अंजना चौधरी या बेपत्ता असतानाच मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुमारे 20 ते 25 गाड्यांच्या ताफ्यात त्या निवडणूक कार्यालयात प्रकटल्या. अत्यंत तणावाच्या वातावरणात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी कंबर कसली होती, त्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. हा सर्व प्रकार भाजपच्या दबावाखाली आणि गुंडशाहीच्या जोरावर झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
चौधरी यांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या महानंदा तुमकुटे आणि पर्यायी भाजप उमेदवार मीरा तुबाकले या दोनच उमेदवार शिल्लक आहेत. विशेष म्हणजे, पर्यायी भाजप उमेदवारही सध्या ‘गायब’ असल्याचे समजते. त्यामुळे विरोधकांचा काटा काढून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
हा महाराष्ट्र आहे की बिहार? – अमित देशमुख
निलंगा तालुक्यातील तांबाळा गटात जे घडले, ते अत्यंत अशोभनीय आहे. दिवसाढवळ्या उमेदवाराचे अपहरण होते आणि दबावाखाली अर्ज मागे घेतला जातो, हे पाहून हा महाराष्ट्र आहे की बिहार, असा प्रश्न पडतो. मतदानापूर्वीच इतकी गुंडशाही सुरू असेल, तर आपण कुठे चाललो आहोत? ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे, अशा शब्दांत माजी मंत्री अमित देशमुख यांनी मदनसुरी येथील सभेत सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.

























































