Latur News – बोरगांव-नाहोलीतील ग्रामस्थांनी शक्तीपीठाची मोजणी रोखली, पन्नास कोटी दिले तरी शेतकऱ्यांचा विरोधच

राज्यातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या काळजाचा तुकडा हिरावून घेण्याचे पाप करत आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली जमीन हडपण्याचा डाव सरकारचा आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संतापला असून शक्तीपीठाला या भागातील शेतकरी विरोध करीत आहेत.

औसा तालुक्यांतून नवीन शक्तीपीठ महामार्ग जात आहे. पण शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. हा महामार्ग बोरगाव, भेटा, नाहोली, कवठा केज, अंदोरा शिवारातून जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गाच्या सिमांकन व संयुक्त मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला तालुक्यातील बोरगाव-नाहोली येथील शेतकऱ्यांनी माघारी पाठवले. आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आम्हाला शेती महत्त्वाची असून शेती वाचली पाहिजे. पथकातील अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास संवाद साधला पण शेतकऱ्यांच शेवटी एकच मागणी केली की कितीही मोठे संकट आले तरीही आमची शेती शक्तीपीठ महामार्गात जाऊ देणार नाही, आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्या शिवाय शांत बसणार नाही. ही संयुक्त मोजणी रोखली गेली त्यावेळी बोरगाव-नाहोली येथील शेतकऱ्यांमध्ये बालाजी साळुंके, शिवकुमार पाटील, नवनाथ घोडके, राजेंद्र विठ्ठल घोडके, यशवंत घोडके, रवि साळुंके, कैलास पाटील,आ बासाहेब साळुंके, लालासाहेब साळुंके, विठ्ठल पाटील, पांडुरंग साळुंके, संग्राम जाधव या शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ रद्द करण्यात यावा म्हणून पंचानाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत.

प्रामुख्याने सिमाकंन व संयुक्त मोजणीसाठी पथकामध्ये उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, औशाचे तहसिलदार घनश्याम आडसूळ, नायब तहसीलदार अजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी, एच.पी.काळे भुमापक अधिकारी, शिंदे बी.डी. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, स्वाती वाघे मंडळ अधिकारी, राम दुधभाते तलाठी नाहोली, गजानन सावंत मोनार्च कंपणी शक्तीपीठ महामार्ग, सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.एस.जाधव तसेच एस बोराडे शाखा अभियंता यांत्रिकी उपविभाग, औसा, भादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी आदी उपस्थित होते.

शेती मानवासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवते. सरकार हेच आमच्या कडून हिसकावून घेत आहे हे आम्ही कदापि होवू देणार नाही. आमची शेती जात आहे हा लढा खुप मोठा आहे. आणि शेवटी पर्यंत शक्तीपीठाला विरोध राहणार आहे. – नवनाथ घोडके पाटील (नाहोली ता.औसा)

शेती आणि माती आमची आई आहे.मुळात शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही आणि शक्तीपीठाला विरोध आहे शेती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार आहे. पन्नास कोटी दिले तरी आम्ही घेणार नाही. – बालाजी साळुंक (नाहोली-बोरगाव)

50 कोटी दिले तरीही शक्ती पीठ होऊ देणार नसल्याचा निर्धार

एकीकडे हेच दळभद्री सरकार तिजोरीत खडखडात असल्याचा आव आणीत असून दुसरीकडे असे शक्तीपीठासारखे मोठे उद्योग निर्माण करून नेमकं या सरकारला साध्य काय करायचं आहे. निवडणूक काळात शेतकऱ्याला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अगोदर या सरकारने करावी चालू असलेल्या योजना बंद करण्याचे हे सरकार पाप करीत असून नवीन असे उद्योग निर्माण करून गुत्तेदारांना पोसण्याचे कामच हे सरकार करीत आहे. या भागातील शेतकऱ्यांचा काळजाचा तुकडा हिरावून घेण्याचे हे सरकार पाप करीत आहे. हे आम्ही असे कदापिही होऊ देणार नाही, असा निर्धार या भागातील शेतकऱ्यांनी केला असून मोजणीसाठी आलेल्या पथकाला या भागातील शेतकऱ्यांनी हाकलून लावले आहे.