
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कलांडी गाव शुक्रवारी पुन्हा एकदा गूढ आवाजांनी हादरले. दुपारी 12 वाजून 51 मिनिटांच्या सुमारास जमिनीतून झालेल्या प्रचंड आवाजामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, जीव वाचवण्यासाठी महिला, लहान मुले आणि वृद्धांनी घराबाहेर रस्त्यावर धाव घेतली.दोन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी कलांडी आणि परिसरातील खडक उमरगा परिसरातही अशाच प्रकारचे दोन मोठे आवाज झाले होते. त्यावेळी झालेल्या धक्क्यांमुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले होते, तर काही ठिकाणी पडझडही झाली होती. शुक्रवारी झालेल्या आवाजाची तीव्रता मोठी असल्याने जुन्या आठवणींनी ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.
भूकंप की अतिवृष्टीचा परिणाम?
यापूर्वी जेव्हा अशा घटना घडल्या होत्या, तेव्हा भूकंप संशोधन केंद्राने हे भूकंपाचे धक्के नसल्याचे स्पष्ट केले होते. अतिवृष्टीमुळे जमिनीतील पोकळीत पाणी शिरल्याने किंवा बदलांमुळे असे ‘गूढ’ आवाज येत असल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी वर्तवला होता. मात्र, वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाने याचे ठोस कारण शोधावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रशासनाची भूमिका काय?
सध्या कलांडी परिसरात भीतीचे सावट असून नागरिक घरांत जाण्यास धजावत नाहीत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक महसूल प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तज्ज्ञांच्या पथकाने या भागाची पाहणी करून ग्रामस्थांची भीती दूर करावी, अशी विनंती गावकरी करत आहेत.
सबब माहितीची जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली असता नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) कडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार, या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये.
-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर


























































