Latur News – थंडीच्या कडाक्यात व्यायामाला गेले अन् काळाने घाला घातला; ग्रामविकास अधिकारी विकास कुलकर्णी यांचे निधन

निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु. येथील रहिवासी आणि पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी विकास (प्रशांत) विश्वासराव कुलकर्णी (वय अंदाजे ४५) यांचा गुरुवारी सकाळी व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. कडाक्याच्या थंडीत व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या कुलकर्णी यांच्या निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, विकास कुलकर्णी हे बुधवारी (24 डिसेंबर 2025) रात्री आपल्या मूळ गावी अंबुलगा बु. येथे मुक्कामी होते. गुरुवारी पहाटे नेहमीप्रमाणे ते लांबोटा-तोगरी रस्त्यावरून व्यायामासाठी घराबाहेर पडले. रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागीच कोसळले.

शेताकडे निघालेल्या काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तातडीने कुलकर्णी यांना निलंगा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, व्यायाम करत असतानाच हा हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

​अंबुलगा गावात शोककळा

विकास कुलकर्णी हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निलंगा पंचायत समितीसह अंबुलगा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता अंबुलगा बु. येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.