दिवाळीवर दुष्काळाचे सावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हडोळती

देशभरात दिवाळ सणाची लगबग सुरू असतानाच हडोळती येथे मात्र दिवाळीवर दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी खरीप आणि रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे दिवाळसण साजरा करण्यासाठीही शेतकऱ्यांच्या खिशात पैसे शिल्लक नाहीत.परिणामी ऐन दिवाळीत येथील बाजार ओस पडला आहे.

आकर्षक आकाश कंदील, पणत्या, फटाक्याची सजलेली दुकाने, पुजा साहित्याचे कीट, खतावनी व रोज मेळ वह्या असे विविध साहित्य बाजारात दाखल झाले आहेत. गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्याकडून विविध योजना मांडण्यात आल्या आहेत. पण खिशात पैसेच नसल्याने शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. यामुळे व्यापारी वर्गाकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे.

एकीकडे पाऊस नसल्याने आटलेले जलसाठे दुसरीकडे बांधावर न उगवलेले गवत त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याच्या शोधात शेतकरी व्यस्त आहेत. जनावरांच्या चाऱ्याचे दर आताच गगनाला भिडलेले असल्याने शेतकरी पशुधनासाठी चारा साठवण्यामध्ये व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचा दिवाळी हा सण शेतकरी जडावलेल्या अंतकरणाने कसा साजरा करतील अशी परिस्थिती आहे. येथील व्यापारी अजित गोदवार यांनी रोजमेळ खतावणी २० टक्क्यांनी, फटाके १ टक्क्यांनी दर वाढलेले आहेत. आकाश कंदील १०० रुपया पासून ३०० रुपये पर्यंत आहेत. ग्रामीण भागात मातीच्या पणत्याचा वापर केला जातो. त्याची जागा आता रंगबेरंगी पणत्यांनी घेतली आहे त्यामुळे या पणत्याचेही दर वाढल्यामुळे गिऱ्हाईक या पणत्या घेण्यासही तयार नसल्याची खंत विक्रेत्यांनी सामनाशी बोलताना सांगितली. शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दिवाळी या सणाची रयाच गेली असल्याचे चित्र दिसत आहे.