लातूर- चोरट्यांचा धुमाकूळ, सात तोळे सोने पळवले

2722
फोटो प्रातिनिधीक

दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावण्याच्या दोन घटना लातूर शहरात घडल्या. या मध्ये सात तोळे सोने पळवण्यात आले. शहरातील प्रकाशनगर भागामध्ये एका प्राध्यापिकेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे गंठण अज्ञात दुचाकीस्वाराने पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुषमा संभाजी थोरात यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्या आपल्या आईसोबत नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या होत्या. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक एक मोटारसायकलस्वार समोर आला. त्याचा तोंडाला पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधलेला होता. अंगामध्ये काळ्या रंगाचे जॅकेट होते. त्याने गळ्यातील गंठण हिसकावून घेतले. सुमारे 70 हजार रुपयांचे साडेतीन तोळ्यांचे गंठण पळवल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील पद्मा नगर भागातील ज्योती धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्या शेजारी हळदी कुंकवासाठी गेलेल्या होत्या. घरी परत येत असताना अचानक एक दुचाकीस्वार समोर आला. त्याने ज्योती यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे गंठण हिसकावले आणि तो पळून गेला. त्याच्या तोंडाला पांढऱ्या रंगाचा रुमाल व अंगामध्ये काळ्या रंगाचा शर्ट होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या