लातूर मधील तीन सहाय्यक कामगार आयुक्तासह एका निरीक्षकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील प्रभारी तीन सहाय्यक कामगार आयुक्तांनी व एका निरीक्षकाने संगनमत करून कामगारांची 1 कोटी 22 लाख 45 हजार 276 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चार जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील प्रभारी सरकारी कामगार अधिकारी सुधाकर गुणवंतराव कोनाळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उदगीर नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन व इतर लाभ वितरणातील गैरव्यवहाराबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. दिनांक 7 जून 2022 रोजी चौकशी समितीचे अध्यक्ष तथा कामगार उपायुक्त संभाजीनगर यांनी दिलेल्या अहवालात पी.एस. पांडे – तत्कालीन प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त लातूर, डि.टी. पाटील – तत्कालीन प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त, जे.व्ही. मिटके – तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी लातूर, एस.डी. राजपूत – तत्कालीन दुकान निरीक्षक श्रेणी 2 यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले होते.

उदगीर नगर परिषदेतून निवृत्त झालेल्या 148 कामगारांची दिनांक 1 जानेवारी 2006 ते 31 मे 2014 पर्यंतच्या कालावधीतील निवृत्ती वेतनाची थकीत रक्कम, उपदान, रजा रोखीकरण व अंश राशीकरणाची रक्कम 3 कोटी 11 लाख 39 हजार 590 रुपये देण्यात आलेली नव्हती. त्याचप्रमाणे सफाई विभागातील 175 कामगारांचे सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम 1 कोटी 3 लाख 38 हजार 521 रुपये देणे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक होते. जिल्हाधिकाऱ्यांनी 4 कोटी 64 लाख 55 हजार 484 रुपये एवढी रक्कम नगर परिषद कार्यालयास प्राप्त होणाऱ्या अनुदानातून कपात करून सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या खात्यात 4.8.2015 रोजी जमा केली होती. मात्र 11 ऑगस्ट 2015 रोजी रोख रक्कम काढून 128 कामगारांना रक्कम वितरीत करण्यात आली होती. प्रत्यक्षात कामगारांना धनादेश देणे अथवा त्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करणे अपेक्षीत होते. उमाकांत दामरगीदे यांनी त्यांच्या दिलेल्या तक्रारीत 60 हजार 500 रुपयांच्या रसिद तिकीटावर स्वाक्षरी घेण्यात आली परंतु, प्रत्यक्षात 40,000 रुपये देण्यात आल्याची तक्रार केली होती. 20 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दिल्यानंतर तहसीलदार उदगीर यांनी कामगार आयुक्तांच्या खात्यात 1 कोटी 22 लाख 45 हजार 276 रुपये चेकद्वारे जमा केले. ही रक्कम सुध्दा कर्मचाऱ्यांना धनादेश अथवा त्यांच्या बँक खात्यात वर्ग करणे अपेक्षीत असताना मराठवाडा लालबावटा कामगार युनियन यांच्या नावे धनादेश देऊन अपहार केल्याचे दिसून आले. 1 कोटी 22 लाख 45 हजार 276 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चारजणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.