दोन ट्रक चालकांचे अपहरण करुन लुटले, अज्ञात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

दोन ट्रक चालकांना अज्ञात चार मोटारसायकल स्वारांनी अपहरण करुन लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी राम माधव मुंढे यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादी हा नागनाथ मुंढे यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करतो. 21 जानेवारी रोजी वसवाडी येथून तो आणि दुसरा एक चालक प्रकाश लक्ष्मण घुगरे हे रेणापूर तालूक्यातील शेरा येथे ट्रक घेऊन जात होते. शेरा पाटीजवळ सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अनोळखी चार युवक मोटारसायकलवर आले व त्यांनी ट्रकसमोर मोटारसायकल लावली. फिर्यादी व प्रकाश घुगरे चालक यांना ट्रकच्या खाली उतरवले आणि शिवीगाळ केली. आमच्या मोटारसायकलला कट का मारलास म्हणून ते शिवीगाळ करुन मारहाण करीत होते. त्यांच्या मोटारसायकलचे क्रमांक फिर्यादीने पाहिले होते. एम.एच.24 एआर 8074 आणि एम.एच 024 एझेड 8526 असे क्रमांक होते. त्यांची नावे दयानंद, प्रविण, अजय, प्रविण अशी होती. कारण ते या नावांनीच एकमेकांना हाका मारीत होते. दोघांनी चालक प्रकाश घुगरे यास एका मोटारसायकलवरुन घेऊन गेले. तर दोघांनी फिर्यादी राम यास डोळ्याला पट्टी बांधून नेले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका शेतात मोटारसायकल उभी केली. कमरेच्या बेल्टने मारहाण केली. पॅन्टच्या खिशातील 4 हजार रुपये, एक रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत ८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि ते मोटारसायकलवरुन निघून गेले. लाईट दिसत असल्याने फिर्यादी गावात गेल्यानंतर त्यास ते गाव दर्जीबोरगाव असल्याचे समजले. तिथून चालत तो रेणापूर पोलीस ठाण्यात आला. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन चारजणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या