
सामना प्रतिनिधी। अहमदपूर
अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी येथील गावकऱ्यांनी समाजापुढे नवीन आदर्श ठेवला आहे. गावकऱ्यांनी वीजेचा शॉक लागून मृत्यू पावलेल्या वानरावर अंत्यसंस्कार केले. एवढेच नाहीतर वानरांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. माणसा एवढेच मुक्या प्राण्यावरही प्रेम करणाऱ्या या गावकऱ्यांची तालुक्यात चर्चा होत आहे.
अहमदपूर तालुक्यातील दीड – दोनशे उमरे असलेले आनंदवाडी हे गाव. या गावात वारकरी संप्रदायाची संख्या बऱ्यापैकी असून आनंदवाडी शेत शिवारामध्ये एका वानराचा शॉक लागून मृत्यू झाला. या वानराची मृत्यू झाल्याची बातमी गावात समजताच गावाकऱ्यांनी एकच गर्दी झाली. बघता बघता अख्खा गाव एक झाले. गावातील नागरिकांनी या वानराला बैलगाडीमध्ये घालून गावात आणले व हनुमान मंदिरात आणून त्या वानराची पुजा अर्चा केली. त्याची गावातील सर्व नागरिकांनी व महिलांनी भजन करून मिरवणूक काढून हनुमान मंदिराच्या बाजुला अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गावातील सर्वांनी मिळून वानराचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्वांनी वानराचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी आनंदवाडी गावातील सर्वच समाजातील लोक उपस्थित होते. सर्व समाजातील लोकांनी दर्शन घेऊन अंत्यविधी केला व अंत्यविधी झाल्यानंतरच सर्व गावच्या चुली पेटल्या.






























































