
चाकूर तालुक्यातील मौजे शेळगाव ते चाकूर रोडवरील तिरू नदीच्या पुलाखाली एका सुटकेस मध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रूप करण्यात आला होता, असे कळते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकूर तालुक्यातील शेळगाव- चाकूर रोड वरील तिरू नदीवरील पुलाखाली दि.२४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक सुटकेस आढळून आली होती. मासेमारी करणाऱ्या मुलांनी ती पाहिली आणि पोलीस पाटलांना त्याची माहिती दिली. तातडीने पोलिसांशी संपर्क साधून सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह असल्याचे कळवण्यात आले. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला.
सुटकेस उघडण्यात आल्यानंतर मयत महिलेस कोंबून भरल्याचे दिसत होते. मृत व्यक्तीची ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रूप करण्यात आला होता. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे. सर्वात प्रथम मृत महिला कोण ही ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.