तब्बल दहा महिन्यांनंतर प्रथमच घुंगरांचा छनछनाट, दिलखेच लावण्यांच्या अदाकारीने रसिक घायाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘विचार काय हाय तुमचा हो पाहुणं…’, ‘कवडसा चांदाचा पडला…’, ‘कसं काय पाटील बरं हाय का…’, ‘या होऊ द्या हो दिलाचा दिलबरा’ अशा विविध पारंपरिक व उडत्या चालीवरील लावण्यांचे सादरीकरण करत कलावंतांनी रसिकांना घायाळ केले. या सादरीकरणास शिट्टय़ा व टाळ्यांच्या गजरात पुणेकर रसिकांनी भरभरून दाद दिली.

कोरोना आपत्तीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजेच तब्बल दहा महिन्यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचा पडदा पुन्हा लावणी कलावंतांसाठी उघडला. कोरोना काळानंतरचा पहिला लावणी प्रयोग आज बालगंधर्व रंगमंदिरात सादर झाला. माया खुटेगावकर, संगीता लाखे, अर्चना जावळेकर, प्राची मुंबईकर, स्वाती शिंदे, अमर वाघमारे, अभिजित राजे आदी विविध कलावंतांनी आपला कलाविष्कार सादर केला. पारंपरिक व उडत्या चालीवरील विविध लावण्यांसह चित्रपट गीतांचे सादरीकरण कलावंतांनी केले. पुणेकर रसिकांनी तिकिटांसाठी रांगा लावून या कलावंतांच्या कलेला भरभरून दाद दिली.  पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने कलावंतांचा आणि कोरोनाकाळात धान्य वितरित करणाऱया मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निर्माते शशी कोठावळे, डॉ. शंतनू जगदाळे, आप्पा झांबरे, निकिता मोघे आदी उपस्थित होते.

जयप्रकाश वाघमारे म्हणाले, ‘आजकालच्या जमान्यात चित्रपट व दूरदर्शन मालिकांमधील कलावंतांचे कौतुक होत आहे. हे चांगले आहे. मात्र, उपेक्षित अशा तमाशा व लावणी कलावंतांचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे.’

नृत्यांगना माया खुटेगावकर म्हणाल्या, ‘कोरोना आपत्तीच्या काळामध्ये अनेक कलावंतांनी मिळेल ते काम करून आपले पोट भरले. वेळप्रसंगी भाजीविक्रीसुद्धा केली. आमच्या कला सादरीकरणास सुरुवात झाल्याने आजचा आनंद आम्ही शब्दांत वर्णन करू शकत नाही’, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.