लॉरेन्स गँगचे दोन तुकडे पडले, रोहित गोदाराने वेगळी गँग बनवली

Lawrence-Bishnoi

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला, बाबा सिद्दीकीची हत्या आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगचे दोन तुकडे पडले आहेत. लॉरन्स गँगपासून गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा वेगळे झाल्याचे वृत्त आहे. लॉरेन्स तुरुंगात गेल्यानतंर हे दोघेच परदेशातून गँग सांभाळत होते.

लॉरेन्स गँग आणि पंजाब पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साबरमती तुरुंगात कैद असलेला लॉरेन्स आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांचा एक गट तसेच कॅनडातील गोल्डी आणि गोदारा यांचा दुसरा गट तयार झाला होता. मात्र, या दोन्ही बाजूंकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. गोल्डी ब्रार आपल्यासोबत गोदाराला घेऊन वेगळा झाला आहे. लॉरेन्सच्या सूचनेवरून हे दोघे कॅनडातून टोळी चालवत होते. पंजाब, राजस्थान, हरयाणा आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांत दहशत पसरवत प्रसिद्ध व्यक्तींची हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे गुन्हे या टोळीने केले आहेत.