
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे भरदिवसा एका वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, आरोपी पळताना त्यांची मोटारसायकल बंद पडल्याचेही दिसून आले आहे.
ही घटना कटवारू का पुरा परिसरात घडली. मृत व्यक्तीची ओळख अॅडव्होकेट राजीव सिंग अशी झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजीव सिंग हे नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या एका हल्लेखोराने त्यांच्याजवळ येत जवळून देशी कट्ट्याने गोळीबार केला. गोळी लागल्याने सिंग जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. फुटेजमध्ये हल्लेखोर आधी थांबून संधी साधताना दिसतो आणि नंतर जवळून गोळीबार करतो. त्याचा साथीदार मोटारसायकलवरच बसलेला होता.
गोळीबार केल्यानंतर आरोपी पळण्यासाठी मोटारसायकलकडे धावला; मात्र काही वेळ मोटारसायकल सुरूच झाली नाही. तोपर्यंत परिसरातील काही नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले. आरोपींनी त्यांनाही बंदुकीचा धाक दाखवत काही वेळाने मोटारसायकल सुरू करून तेथून पळ काढला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तसेच वकिलांच्या संघटनांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.



























































