
कोर्टरूम म्हटले की तिथे दोन्ही बाजूच्या पक्षकारांकडून होणारे जोरदार युक्तिवाद, कोर्टाकडून प्रश्नांचा भडिमार, अधूनमधून फटकारे-ताशेरे हे चित्र नेहमीचेच, मात्र सोमवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे रौद्ररूप पाहायला मिळाले. ‘सुप्रीम कोर्ट अदानी-अंबानीसाठी काम करते’, असे शब्द वकिलाच्या तोंडून बाहेर पडले आणि त्यावर सरन्यायाधीश चांगलेच भडकले. मी इशारा देतोय. माझ्या न्यायालयात बोलताना 100 वेळा विचार करा… अशा कडक शब्दांत तंबी देत सरन्यायाधीशांनी वकिलावर संताप व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयात सकाळच्या सत्रात तातडीने सुनावणी आवश्यक असलेली प्रकरणे सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली जातात. त्यानुसार सोमवारी अॅड. मॅथ्युज नेदुमपारा यांनी त्यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी विनंती केली. आपण न्यायालयीन नियुक्त्यांसंबंधी याचिका दाखल केली आहे. ती याचिका अद्याप नोंदणीकृतही केलेली नाही. याउलट अंबानी, अदानी यांच्या याचिका सूचिबद्ध आणि सुनावणीसाठी दाखल केल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालय अदानी-अंबानींसाठी काम करतेय की काय, असा मुद्दा अॅड. नेदुमपारा यांनी उपस्थित केला. त्यावर सरन्यायाधीश सूर्य कांत भडकले. त्यांनी अॅड. नेदुमपारा यांची कडक शब्दांत कानउघाडणी करण्यास सुरुवात केली. माझ्या न्यायालयात बोलताना शंभर वेळा काळजी घ्या, असा सज्जड दम सरन्यायाधीशांनी दिला. यावेळी अॅड. नेदुमपारा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी संबंधित याचिकेची छाननी अद्याप केलेली नाही, असे त्यांनी सांगितले. सरन्यायाधीशांनी मात्र नेदुमपारा यांना थेट कारवाईचा इशारा देत त्यांची बोलती बंद केली. भरगच्च कोर्टरूममध्ये काही मिनिटे हा गरम माहोल होता. अन्यवेळी शांत, संयमी भूमिका घेत सरकार आणि पक्षकारांना फैएलावर घेणारे सरन्यायाधीश अदानी, अंबानींचे नाव घेताच अचानक कमालीचे भडकल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.
कोर्टरूममधील संवाद
अॅड. नेदुमपारा ः लॉर्डशिप्स आपण अदानी आणि अंबानींसाठी घटनापीठाची स्थापना केली आहे, पण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने एनजेएसीच्या याचिकेकडे साधे पाहिलेदेखील नाहीय. रजिस्ट्रीने आतापर्यंत छाननीही केलेली नाही.
सरन्यायाधीश ः अशी कोणतीही परिस्थिती नाही. अनावश्यक मुद्दे निर्माण करू नका.
अॅड. नेदुमपारा ः न्यायालय अदानी, अंबानींसाठी काम करतेय. त्यांच्यासाठी घटनापीठे तयार केली आहेत. याचा कोर्टाच्या सामान्य कामकाजावर परिणाम होत आहे. न्यायिक नियुक्तीचा मुद्दा सर्वसामान्य जनतेशी संबंधित आहेत. याबाबत आम्ही सर्वजण चिंतेत आहोत.
सरन्यायाधीश ः माझ्या कोर्टरूममध्ये बोलताना 100 वेळा विचार करा. तुम्ही मला चंदिगडमध्ये पाहिलेय. तुम्ही मला दिल्लीत पाहिलेय. मी आता तुम्हाला फक्त एक इशारा देतोय. 100 वेळा काळजी घेऊनच बोला. तुम्ही भूतकाळात गैरवर्तन केलेय म्हणून आता पुन्हा तसे माझ्याशी वागाल, असे समजू नका.
अॅड. नेदुमपारा ः माय लॉर्ड, मी काही बोललो का? मी फक्त याचिकेची लिस्टिंग (सुनावणीची तारीख) मागत आहे.
सरन्यायाधीश ः मी तुम्हाला इशारा देतोय. एवढेच.
अॅड. नेदुमपारा ः मी फक्त एनजेएसी प्रकरणाबद्दल बोललो.
सरन्यायाधीश ः तुम्हाला किमान माझ्या न्यायालयात कसे वागायचे हे आता समजेल.
n तुम्ही मला चंदिगडमध्ये पाहिलेय. तुम्ही मला दिल्लीत पाहिलेय. मी आता तुम्हाला फक्त एक इशारा देतोय. माझ्या कोर्ट रूममध्ये 100 वेळा काळजी घेऊनच बोला. तुम्ही भूतकाळात गैरवर्तन केलेय म्हणून आता पुन्हा तसे माझ्याशी वागाल, असे समजू नका.
प्रकरण काय…
n अॅड. नेदुमपारा यांच्या याचिकेपूर्वी दिल्लीतील प्रकरण सुनावणीला आले होते. योगायोगाने ते प्रकरण अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित होते. केजी बेसिन गॅस मायग्रेशन वादात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. त्यावर सरन्यायाधीशांनी प्रकरणाच्या सुनावणीसाठी शेडय़ुल निश्चित केले.
n गेल्या वर्षीही तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी अॅड. नेदुमपारा यांना फटकारले होते. न्यायालयात राजकीय भाषण करू नका, अशी ताकीद त्यांनी दिली होती.





























































