
गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील उपाहारगृह बंद केल्याने ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी आज पत्नीसह ठिय्या आंदोलन सुरू केले. उपाहारगृह बंद करून इतरांना ते देण्याचा कुटील डाव आखला जातोय, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
याप्रकरणी लक्ष्मण गायकवाड म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून मी चित्रनगरीत उपाहारगृह चालवतोय. त्यावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र 2017 साली करार करून व्यापारी तत्त्वाने याचे भाडे भरत असतानाही काही अधिकाऱयांनी येऊन महिना तीन लाख रुपये याप्रमाणे 75 लाख रुपयांचे थकीत भाडे दाखवून उपाहारगृह बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रात्री 12 वाजल्यानंतर तेथील नळ कनेक्शन तोडण्यात आले आणि उपाहारगृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गायकवाड यांनी केला. सध्या मी उपाहारगृह बंद करून कामगारांसह ठिय्या आंदोलनाला बसलो असल्याचे त्यांनी सांगितले.
महामंडळाचे म्हणणे काय
लक्ष्मण गायकवाड यांना करारनामाचा कालावधी संपल्यानंतरही सहानुभूतीपूर्वक विचार करून 1 मे 2017 ते 30 एप्रिल 2018 या कालावधीसाठी करार करण्यात आला होता. हा कालावधी संपल्यानंतरही गायकवाड जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे सक्षम प्राधिकाऱयांच्या न्यायालयात हे प्रकरण गेले. त्यांनी एक महिन्याच्या आत जागा खाली करण्याचे व थकबाकीची रक्कम भरण्याचे आदेश दिले, मात्र एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर गायकवाड यांनी शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीत शहर दिवाणी न्यायालयाने सक्षम प्राधिकाऱयांनी दिलेले निष्कासनाचे आदेश कायम ठेवले आहेत, असे दादासाहेब फाळके चित्रनगरी-महामंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.



























































