
ज्यांनी पिढ्यान्पिढ्या खपून पक्ष उभा केला, त्यांच्याशीच केलेली गद्दारी महाराष्ट्रातील जनतेला पटलेली नाही. त्यामुळे या गद्दारांचा राजकारणातील काळ आता फक्त एक वर्षाचा राहिला आहे, तोही भाजपच्या भरवशावर, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी केला.
शिवसेनेच्या ‘शिवगर्जना अभियानां’तर्गत शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता सातारा येथे शाहू कलामंदिरात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शिवनिर्धार मेळावा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यात सातारा, कराड व दहीवडी येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. साताऱ्यात झालेल्या बैठकीत लक्ष्मण हाके बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या व युवा सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सुप्रदा फातर्पेकर, माजी आमदार बाबुराव माने उपस्थित होते.
लक्ष्मण हाके म्हणाले, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग तसेच केंद्रीय सत्तेबद्दल आज खूप मोठ्या शंका निर्माण झाल्या आहेत. भाजपचेच नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीच याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. सत्तासंघर्ष, पक्षाचे नाव-चिन्ह अशा सर्व बाबतीत जे संकट आले आहे, त्याची जबाबदारी ज्येष्ठ मंडळी घेतील, पण तुम्ही आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायचे आहे. आपण त्या तांत्रिक गोष्टीमध्ये अडकून पडायचे नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी आपल्याला जनआंदोलन उभे करावे लागेल.
सुप्रदा फातर्पेकर म्हणाल्या, शिवसैनिकांसह सामान्य माणूसही पेटून उठलेला असून, ही धगधगती आग मनात कायम ठेवा. येत्या काळात महिलांचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यायचा आहे.
एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील असूनही येथील शिवसैनिक जागचे हलले नाहीत. मोठ्या प्रमाणात आमिषे येऊनही शिवसैनिकांनी निष्ठा सोडली नाही. संघटन मजबूत करण्यात आम्ही यशस्वी झालो. जिल्ह्यातील जे गेले त्यांचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी व्यक्त केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अजित यादव, विश्वनाथ धनावडे, दत्ता नलावडे, तालुकाप्रमुख सागर रायते, नितीन गोळे, संतोष चव्हाण, रमेश बोराटे, संतोष मुसळे, आदेश जमदाडे, सुरेश चव्हाण, शहरप्रमुख शिवराज टोणपे, बाळासाहेब शिंदे, महेश गुजर, बापू गाडवे, संजय कासुर्डे, महिला आघाडीच्या सुनंदा महामुलकर, युवा सेनेचे सागर धोत्रे, शिवसामर्थ्य सेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भणगे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
शिंदेंना शेती करायला गावाकडे जावेच लागेल – बाबुराव माने
भाजपने सत्तेचा गैरवापर करून, स्वायत्त संस्थांना बटिक बनवून शिवसेनेचा घात करण्याचे षडयंत्र रचले. त्यामुळे जनता पेटून उठली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे वादळ महाराष्ट्रभर निर्माण झाले आहे. चाळीसपैकी एक जरी आमदार पडला, तर राजकारण सोडून गावाकडे जाऊन शेती करेन, अशी वल्गना एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे त्यांना शेती करायला गावाकडे जावेच लागेल. ते ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत, असा टोला बाबुराव माने यांनी लगावला.




























































