
मुंबई शहर व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने जनजीवन विस्कळित करण्याबरोबरच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. महाराष्ट्रातील पावसाच्या संकटात राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीला तत्परतेने उभे राहावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे ओढवलेल्या संकटात राज्य आणि केंद्र सरकारने कुठलाही भेदभाव न करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे.
राज्यात काही दिवसांपासून पूर्व विदर्भ, पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र अशा दोन्ही सरकारला सतर्कता आणि मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
पूर्व विदर्भ, पुणे,कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि परिसरातील भागात सुद्धा अशीच स्थिती आहे.…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 25, 2024
मुंबई शहर आणि परिसरातील भागातसुद्धा पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याची स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. तेथे आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे लहान व्यापारी व दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गरीब कुटुंबाच्या घराचे नुकसान झाले आहे. या सर्वांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. राज्य व केंद्र सरकार दोघांनी मिळून महाराष्ट्रावर आलेल्या संकटात कोणताही भेदभाव न करता पुढे येऊन मदत करावी ही आमची मागणी आहे. या पावसात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना उभे करणे हेदेखील आव्हान आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.