
>> प्रवीण धोपट
ट्रेडिंगच्या विश्वात कँडलस्टिक पॅटर्न्स हे दिशादर्शक मानले जातात. संख्येने शंभराच्या वर असलेले कँडलस्टिक पॅटर्न्स जगभरात करोडो लोक वापरतात. स्टॉक, करन्सी, कमॉडिटी, क्रिप्टो करन्सी इत्यादी जवळ जवळ सर्वच मार्केटमध्ये ते तितकेच लोकप्रिय आहेत. त्यातले मोजके पॅटर्न्स खूपच प्रसिद्ध आहेत.
बेअरिश हरामी – ‘हरामी’ हा शब्द आपल्याकडे शिवी म्हणून वापरला जातो. मार्केटमध्ये हा पॅटर्न रिव्हर्सल पॅटर्न म्हणून ओळखला जातो. चढत्या मार्केटमध्ये दोन पँडल्सचा मिळून हा पॅटर्न तयार होतो. एका मोठय़ा बुलिश कँडलनंतर त्याला लागूनच एक छोटी बेअरिश कँडल तयार होते. हा संकेत मार्केट खाली येण्याचा असतो.
बुलिश हरामी – बेअरिश हरामीच्या उलट स्थिती बुलिश हरामी पॅटर्नमध्ये तयार होते. मार्केट खाली खाली जात असताना एका मोठय़ा बेअरिश कँडलनंतर एक बुलिश कँडल तयार होते. हा संकेत मार्केट रिव्हर्स होण्याचा म्हणजेच वर जाण्याचा असतो.
पिअर्सिंग पॅटर्न – हा पॅटर्न रिव्हर्सल पॅटर्न म्हणून ओळखला जातो. लगतच्या दोन कँडलच्या विशिष्ट फॉर्मेशनवरून याचा क्लिअर अंदाज बांधता येतो. जर मार्केट वर जाणार असेल तर पिअर्सिंग पॅटर्नमधली पहिली कँडल लाल रंगाची आणि मोठी कँडल तयार होते. त्यानंतर तिच्या लगतची कँडल पहिलीच्या ‘लो’च्या खाली ओपन होऊन लाल कँडलच्या मध्याच्या वर जाऊन क्लोज होते. अर्थातच या कँडलचा रंग हिरवा असतो. यानंतर मार्केट वर जाते.
डार्क क्लाऊड कव्हर – डार्क क्लाऊड कव्हर हा पिअर्सिंग पॅटर्नच्या अपोझिट असतो. हा पॅटर्न अपट्रेंडनंतर तयार होतो. यातही लगतच्या दोन कँडलचं फॉर्मेशन महत्त्वाचं असतं. या पॅटर्नमध्ये पहिली कँडल मोठी आणि हिरवी कँडल तयार होते. त्याच्या लगत अशी कँडल तयार होते की, जी ओपन होते हिरव्या कँडलच्या वर, पण क्लोज होते हिरव्या रंगाच्या कँडलच्या मध्याच्या खाली. अर्थात तिचा कलर लाल असतो. हा संकेत मार्केट खाली जाण्याचा असतो.
हँगिंग मॅन – या शब्दाच्या उच्चारावरून लटकलेल्या माणसाचं चित्र डोळ्यासमोर येतं. त्याची रचना तशीच असते. हा पॅटर्न हॅमरच्या जवळ जाणारा आहे, पण फरक हा आहे की, हँगिंग मॅन हा पॅटर्न अपट्रेंडनंतर तयार होतो. याची रिअल बॉडी लहान असते आणि टेल (शेपटी) लांब असते. हा संकेत मार्केट खाली जाण्याचा असतो.
इन्व्हर्टेड हॅमर – इन्व्हर्टेड हॅमर हा हँगिंग मॅनच्या रचनेसारखा असतो, पण काम मात्र विरुद्ध करतो. हा पॅटर्न डाऊनट्रेंडनंतर तयार होतो. याची रिअल बॉडी छोटी असते आणि अप्पर शॅडो लांब असते. हा संकेत मार्केट वर जाण्याचा असतो.
थ्री ब्लॅक क्रो – लगतच्या तीन कँडलचा मिळून हा पॅटर्न बनतो. यातली प्रत्येक कँडल ही लाल रंगाची असते आणि पहिल्या कँडलनंतर दुसरी आणि त्यानंतर तिसरीनेही लोअर हाय आणि लोअर लो तयार केलेला असतो. हे स्ट्राँग बेअरिश सेंटिमेंट म्हणून ओळखले जाते आणि यानंतर डाऊनट्रेंड निश्चित असतो.
थ्री व्हाईट सोल्जर – थ्री ब्लॅक क्रोच्या अपोझिट याची रचना असते. एकानंतर एक तयार झालेल्या तिन्ही कँडलच्या रचनेत दुसरी कँडल पहिलीचे हायर हाय आणि हायर लो तोडते. हा संकेत स्ट्राँग बुलिश म्हणून ओळखला जातो. यानंतर मार्केट वर जाण्याची शक्यता असते.
(लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)



























































