
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
जंकफूडविरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, असे असूनही अनेकांचे हे व्यसन सूटत नाही. त्यामागचे कारण संशोधकांनी स्पष्ट केले आहे. ड्रग्जचे व्यसन सोडल्यानंतर ज्याप्रकारचे त्रास होतात, त्यापेक्षा जास्त त्रास जंक फूडचे व्यसन सोडल्यानंतर होऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. जंक फूड सोडल्यानंतर आठवडाभर माइग्रेन किंवा डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो, असे नुकत्याच झालेल्या संशोधनातून उघड झाले आहे. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतेच संशोधन केले आहे.
साखर आणि मीठामुळे सतत खाण्याची इच्छा होते. तसेच यामुळे रोग होण्याची शक्यताही वाढते. फास्ट फूड आणि जंक फूडमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यामुळे ते घातक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी लवकरात लवकर जंक फूड सोडण्याचा सल्ला दिला आहे. जंक फूड सोडल्यानंतर काही दिवस थकवाही जाणवू शकतो असेही संशोधकांनी सांगितले आहे. ड्रग्जचे व्यसन सोडल्यानंतर जसा त्रास होतो, तसाच त्रास अचानक जंक फूड खाणे बंद केल्यानंतरही होऊ शकतो. मात्र, हे घातक व्यसन सोडण्यासाठी हा त्रास सहन करावा असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.
जंक फूड खाणाऱ्यांनी पाच दिवस जंक फूड खाणे बंद केले तर त्यांचे हे व्यसन सहज सुटणे शक्य असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. पाच दिवस जंक फूड बंद केल्यास त्रास होतो. मात्र, नंतर हा त्रास कमी होतो आणि त्यानंतर आरोग्यातही सुधारणा होते असे त्यांनी सांगितले. जंक फूड आणि फास्ट फूडमध्ये साखर आणि मीठाच्या अतिवापरासह फॅटही जास्त प्रमाणात असते. त्या फॅटमुळे जंकफूडचे व्यसन लागते. हे व्यसन लागल्यानंतर आहारात बदल करणेही अनेकांना कठीण होत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. तसेच या गोष्टींमुळे सतत खाण्याची इच्छा होते आणि जंक फूड खावे असेच वाटते. त्यामुळे शरीराला गरज नसतानाही मीठ, साखर आणि फॅट शरीरात जातात. त्यामुळे लठ्ठपणा वाढत असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
संशोधकांनी 231 जणांची तपासणी करून हे निष्कर्ष काढले आहेत. जंकफूडचे व्यसन सोडल्यानंतर त्यांना माइग्रेन आणि डिप्रेशनचा त्रास जाणवला. सतत जंकफूड खाण्याची इच्छा होत होती. मात्र, पाच दिवस जंक फूड बंद केल्यानंतर त्यांचे व्यसन कमी झाल्याचे संशोधकांनी सांगितले. जंक फूडचे व्यसन वाढत असल्याने 2045 पर्यंत जगाच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकांना लठ्ठपणाची समस्या जाणवेल असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. तसेच लठ्ठपणामुळे टाइप 2 प्रकारचा मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगाचे प्रमाण वाढण्याची भीतीही संशोधकांनी व्यक्त केली आहे.






























































