लेबनॉनची राजधानी बैरूत प्रचंड धमाक्यात नेस्तनाबूत, 100 ठार, 4 हजार जखमी

808

लेबनॉनची राजधानी बैरूत मंगळवारी झालेल्या दोन धमाक्यांत अक्षरशः नेस्तनाबूत झाली. गगनचुंबी इमारती क्षणार्धात धराशायी झाल्या. या धमाक्यात 100 ठार तर चार हजार जण जखमी झाले असून तब्बल तीन लाख लोक बेघर झाले आहेत.

2013 मध्ये एका जहाजावरून जप्त करण्यात आलेले हजारो टन अमोनियम नायट्रेट बैरूत बंदराजवळ असलेल्या एका वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. अमोनियम नायट्रेट अत्यंत ज्वालाग्राही असल्यामुळे त्याची साठवणूक अतिशय काळजीपूर्वक करण्यात येते. मंगळवारी या वेअरहाऊसमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले आणि निमिषार्धात दोन प्रचंड धमाक्यांनी बैरूत शहराची अवस्था होत्याची नव्हती झाली. गगनचुंबी इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. राष्ट्रपती मायकेल इयोन यांनी 2750 टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती दिली.

बैरूतमध्ये सर्वत्र रक्तमांसाचा चिखल
स्फोट होताच बैरूतमध्ये अफरातफर माजली. उंच उंच इमारती पापणी लवण्याच्या आत कोसळल्या. विजेचे खांब, मोबाइल टॉवर धराशायी झाले. या धमाक्यात जवळपास 100 लोक ठार झाले असून चार हजारपेक्षा जास्त जखमी झाले आहेत. या धमाक्यामुळे तीन लाख लोक बेघर झाल्याचे बैरूतचे गव्हर्नर मरकान अबाऊद यांनी सांगितले. बैरुतमध्ये मदतकार्य करणाऱया रेडक्रॉसच्या पथकानेही शहरात सर्वत्र अफरातफर असून रक्तमांसाचा चिखल झाल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या