उल्हासनगरात भाजपला जबरदस्त हादरा, महापालिकेवर भगवा फडकला

6640

राज्याच्या विविध शहरांच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर यांची निवड शुक्रवारी झाली. या निवडीमध्ये उल्हासनगरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. इथे भाजपचा महापौर होता मात्र शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा महापौर निवडून आला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार 44 मते मिळवत विजयी झाल्या आहेत. इथे शिवसेना आणि ओमी कलानी गटाच्या पाठिंब्यामुळे रिपाईंचे भगवान भालेराव ही उपमहापौरपदी निवडून आले आहेत.

bhagwan-bhalerao

उल्हासनगर महापालिकेवर कालपर्यंत भाजप, टीम ओमी कलानी आणि साई (Secular Alliance of India) या आघाडीची सत्ता होती. या आघाडीकडे मिळून 44 जागा होत्या. तर शिवसेनेकडे 21 जागा होत्या. उल्हासनगर महापालिकेमध्ये एकूण 78 जागा असून इथे सत्तास्थापनेसाठी किमान 40 नगरसेवकांचे संख्याबळ असणे गरजेचे होते. ओमी कालानीची पत्नी पंचम कलानी शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत बसल्या. ज्यामुळे ओमी कलानी गटाचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचे दिसून आले. यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढले आणि आशान यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

महापौर निवडीआधी आपले नगरसेवक फुटतील या भीतीने भाजप आणि साई पक्षाने त्यांच्या नगरसेवक लोणावळ्याला पाठवले होते. भाजपला भीती होती की त्यांचे 11 नगरसेवक फुटू शकतात. हे नगरसेवक टीम ओमी कलानी (टॉक) पक्षाचे असून भाजपने आपल्याला फसवल्याची भावना या नगरसेवकांच्या मनात होती. 2017 सालच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने दिलेल्या आश्वासनांवर भरवसा ठेवत टॉक पक्षाच्या 21 नगरसेवकांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. निवडणुकीनंतर भाजपने या निवडून आलेल्या नगरसेवकांना आमीष दाखवत ते आपलेच नगरसेवक असल्याचा दावा करायला सुरुवात केली. यामुळे ओमी कलानी आणि त्यांची साथीदार भडकले होते.

सत्तेसाठी स्थानिक मित्र पक्षाची साथ घ्यायची आणि हळूहळू तो पक्षच संपवायचा ही भाजपची कूटनीती आहे. उल्हासनगर महापालिकेची सत्ता हातची निसटू नये यासाठी भाजपने महापौरपदाचे गाजर दाखवून मित्रपक्ष असलेला अख्खा साई पक्षच गिळला होता. साईच्या सर्वच्या सर्व 11 नगरसेवकांना फोडून विलीनीकरणाच्या नावाने भाजपने त्यांना आपल्या दावणीला बांधले होते. आम्ही पक्ष विलीन केला नाही असे साई पक्ष छातीठोकपणे सांगत असला तरी केवळ पालिकेपुरत्याच मर्यादित असलेल्या या पक्षाचे अस्थित्व आता संपल्यातच जमा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

पप्पू कलानींपासून विभक्त झालेल्या एका गटाने साई पक्षाची निर्मिती करून 2007, 2012, 2017 साली सलग उल्हासनगर महापालिकेत सत्तेचा वाटा घेतला. सन 2007 आणि 2012 मध्ये साई पक्ष शिवसेनेसोबत असताना त्यांना महापौर, स्थायी समिती सभापती पदाचा मान मिळाला होता. मात्र 2017 च्या पालिका निवडणुकीनंतर साई पक्षाने भाजपसोबत युती केली. टिम ओमी कलानीला सोबत घेऊनही भाजपला सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठता आली नव्हती. त्यामुळे दुसऱया टप्प्यात महापौरपद देण्याचे आश्वासन देत साई पक्षाचा पाठिंबा भाजपने मिळवला. मात्र दुसऱया टप्प्यातील महापौरपदाची माळ साई पक्षाच्या गळ्यात घालण्याची वेळ आली तेव्हा भाजपने पलटी मारून विश्वासघात केला. त्यामुळे साई पक्षाने बंडाचे दंड थोपटून महापौरपदाचा उमेदवार उभा केला. हे बंड क्षमवण्यासाठी भाजपने साई पक्षाच्या उमेदवाराला महापौरपद देण्यास अखेर संमती दर्शवली. सुरुवातीला भाजपने दोन पावले मागे घतली असे वाटत होते. मात्र येथेही खेळी करत भाजपने साईपक्षातील सर्व 11 नगरसेवकच फोडून आपल्या पक्षात विलीन करून घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या