
राज्यात वाचन संस्कृतीला बळ मिळावे या उद्देशाने येत्या 15 ऑक्टोबरला ‘ वाचन प्रेरणा दिन ’ साजरा झाला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यात राज्य पातळीवर वेगवेगळ्या उपक्रमांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीची वाचन प्रेरणा दिनाची संकल्पना होती, ‘घेऊ या एकच वसा, मराठीला बनवू या ज्ञानभाषा’. वाचकांना अधिक सजग करावे आणि जे वाचत नाहीत त्यांना वाचनासाठी प्रोत्साहन द्यावे हाच वाचन प्रेरणा दिनाचा मुख्य उद्देश. ही वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे. साहित्यक्षेत्रात या दिवशी अनेक कार्यक्रम, उपक्रम साजरे करण्यात आले. नुकताच या दिनानिमित्त राजहंस पुस्तकपेठ द्वारे लेखक नितीन रिंढे यांना गौरवण्यात आले. साहित्यात मोलाची भर घालणार्या कोणत्याही लेखकाचा गौरव हा स्पृहणीय असतोच. मात्र नितीन रिंढे यांना या निमित्त पुरस्कृत करणे ही हा त्यांच्या मूळ लेखनाचा गौरव केल्यासारखे आहेत. नितीन रिंढे हे जसे लेखक तसे ते हाडाचे वाचक आहेत. जगभरातील साहित्य निर्मितीबाबत ते सजग आहेत. त्यांच्या वाचनाचा आवाका आश्चर्यचकित करणारा असून या जगभरातील विविध भाषेतील साहित्य मराठीत यावे यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘बुक्स ऑन बुक्स’ स्वरूपाच्या साहित्यप्रकारात त्यांचे योगदान मोलाचे अहे.




























































