लेन्स आय – सुतार पक्षी

>> ऋता कळमणकर

जंगलामध्ये शांत वातावरणात ‘टिक-टिक-टिक’ असा एका लयीत आवाज काढणारा आणि त्या आवाजाचा मागोवा घेत गेलं की, झाडाच्या खोडावर आपल्या धारदार चोचीने एखादी कलाकृती बनवत असल्याप्रमाणे कामात मग्न झालेला सुंदर चमकदार रंगसंगतीचा पक्षी म्हणजे सुतार पक्षी. रंगात खूप विविधता पहायला मिळते. आपल्याकडे हिंदुस्थानात कितीतरी प्रकारचे सुतार पक्षी सहज आढळतात. याला खोडफोडय़ा, लाकूडतोडय़ा असेही नाव देतात. या सुंदर पक्ष्याची नखे आणि चोच एकदम धारदार असतात. खोडावर घट्ट पायाची आणि नखांची पकड देऊन चोचीने खोडावरील किडे शिताफीने खातो. आज जगभरात त्यांच्या दोनशेहून अधिक उपजाती आढळतात आणि त्यातल्या अनेक विविधरंगी सुतारांच्या जाती आपल्याला हिंदुस्थानातील जवळपास सर्व जंगलांत बघायला मिळतात. अन्टार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडवगळता हा सर्वत्र दिसतो. अमेरिकेतील कोस्टारिकाच्या वर्षावनात अॅक्रॉन वुडपेकर हा सुंदर काळय़ा, पांढऱया व लाल रंगांचा डोळ्यांभोवती वलय असलेला सुतार पक्षी खूप वेळा कॅमेऱ्यात कैद करता आला.

सुतार हा तसा एकटय़ादुकटय़ाने राहणारा पक्षी. त्याची ही ‘टिकटिक’ ही खोडावरचे किडे खाण्यासाठी आणि इतर सुतार पक्ष्यांशी संपर्क करण्यासाठी असावी असं तज्ञ सांगतात. विविध किडे, मुंग्या, बिया, बेरीज हे याचे खाणे असून झाडावर सतत केलेल्या टिकटिकीमुळे होणार इम्पॅक्ट सहन करण्यासाठी त्याची चोच मजबूत असून त्याची कवटीदेखील मजबूत आणि स्पॉंजी असते. झाडाच्या ढोलीमध्ये हा पक्षी एप्रिल ते जुलैदरम्यान तीन ते आठ अंडी घालतो.

हिमालयातील पर्वतराजीमध्ये हिमालयीन सुतार व पांगोटच्या परिसरात रुफिस बेल्लिइड सुतार पाहण्यात आला. रुफस बेल्लीड सुतार ही हिमालयीन प्रजाती आहे. हिमालयीन वुडपेकर हा भूतान, नेपाळ येथेही दिसतो. हिंदुस्थानभर सुतार पक्ष्याचे विविध प्रकार या आढळतात. तपकिरी टोपीचा पिग्मी सुतार, राखी टोपीचा पिग्मी सुतार हेही हिंदुस्थानात दिसतात. त्याचप्रमाणे काळा सुतारही केरळ, तामीळनाडू, पश्चिम महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी आढळतो. त्याचप्रमाणे पीतकंठी सुतार हा मैनेपेक्षा आकाराने किंचित मोठा, तांबडे डोके, पिवळा गळा असा पक्षी सातपुडय़ापासून आंध्र, केरळ येथे दिसतो. बांबूमिश्रित जंगले, रबर आणि कॉफी प्लॅंटेशन येथे निवास करतो. त्याचसोबत मी हिरवा सुतार हा जिम कार्बेटच्या जंगलात व सत्तालच्या पर्वतरांगांमध्ये पाहिला. छातीवर रेषा, हिरवं अंग व पांढरी भिवईची रेष…खूप सुंदर दिसतो. हिरवीगार जंगले आर्द्र पानगळीची जंगले इथे सापडतो. सोनपाठी सुतार हा अतिसुंदर पक्षी कॅमेऱयात कैद करणे म्हणजे सार्थकता. लाल, काळा, छानदार पिवळा असे नाना रंग धारण करणारा हा पक्षी. यात पुन्हा मोठा सोनपाठी आणि छोटा सोनपाठी असेही आढळतात. अगदी चिमुकला असा फलवस ब्रेस्टेड वुडपेकर हाही मी कार्बेटमध्येच पाहिला. रुफिस सुतार हा पूर्ण तपकिरी सुतार. हा मुंग्याखाऊ असतो. चाहूल लागली की, झाडामध्ये उडून जाणारा सुतार हा पक्षी फोटो काढायला तसा अवघडच, परंतु विविधता थक्क करणारी.

[email protected]