
मेंढपाळ महिलेच्या कुशीत झोपलेल्या 11 महिन्यांच्या बाळाला बिबट्याने पळवल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री पुण्यातील दौंड तालुक्यातील दहिटणे येथे घडली. पुण्यातील रेस्क्यू टीम, दौंड वन विभागाचे पथक आणि यवत पोलीस यांनी आज सकाळपासून शोधमोहीम राबवूनही सायंकाळपर्यंत बाळाचा शोध लागला नसल्याची माहिती दौंडचे वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.
धुळा बोलू भिसे हे आपली पत्नी आणि 11 महिन्यांचा मुलगा मेंढ्यांच्या कळपाजवळ झोपले होते. मध्यरात्री उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला उसाच्या शेतात पळवून नेले. बाळाच्या आई-वडिलांनी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत बिबट्या बाळाला घेऊन पसार झाला. घटनेची माहिती दौंड वन विभागाला देण्यात आल्यानंतर पुणे येथील रेस्क्यू टीम, दौंड वन विभागाचे वनसंरक्षक दीपक पवार, दोडक वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे आणि यवत पोलीस आज सकाळपासून बाळाचा शोध घेत होते. मात्र, उसाचे मोठे क्षेत्र असल्यामुळे सायंकाळपर्यंत बाळाचा शोध लागू शकला नाही. बोरीपारधी गावच्या हद्दीत 17 नोव्हेंबर 2024 रोजी भरदिवसा ऊसतोड मजुराच्या तीन महिन्यांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करीत ठार केले होते. पाच महिन्यांत तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना आहे.
























































