तिसे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा बळी

456
प्रातिनिधिक फोटो

खेड तालुक्यातील तिसे येथील जंगलमय भागात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रानात चरायला सोडलेल्या उमद्या बैलाचा बळी गेला. तीस बौद्धवाडी येथील सूर्यकांत गंगाराम जाधव यांच्या मालकीचा हा बैल होता. तिसे गावात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने येथील नागरिक आधीपासूनच भयभीत आहेत.

काही दिवसांपासून मानवी वस्तीत येऊन हा बिबट्या भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडत होता. तेव्हाच येथील नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाला विनंती केली होती. मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याने आज सूर्यकांत जाधव यांचा सुमारे 35 हजार रुपये किमतीच्या बैलाचा बळी गेला आहे.

या घटनेची खबर वनविभागाला दिल्यावर वनविभागाचे अधिकारी डोईफोडे यांनी घटनास्थळी जाऊन कायदेशीर पंचनामा केला. पाळीव प्राण्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त न केल्यास रानात शेतीकामाला जाणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खेड तालुक्यातील अनेक भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे. बिबट्याच्या दहशतीने घाबरलेले ग्रामस्थ काही ठिकाणी शेतीकामालाही जात नाहीत. शेतात काम करत असताना कधी बिबट्या येईल आणि हल्ला करेल याचा नेक नसल्याने शेतकऱ्याना  कायमच भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे.

काही वर्षांपूर्वी मोरवंडे पंडमवाडी येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्या जांबाज शेतकऱ्याने हातातील काठीचे प्रहार करून बिबट्याला पिटाळून लावले होते नाहीतर त्याच्या जीवावरच बेतणार होते. खेड आष्टी रोडवर दिवसाढवळ्या बिबट्याने दुचाकीस्वारांवर झडप घातली होती. दुचाकीवर मागे बसलेला दुचाकी  स्वार केवळ त्याने पाठीवर अडकवलेल्या बॅगमुळे वाचला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचा बळी जाण्याच्या घटना घडतच आल्या आहेत. बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने वनविभागाने वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामीण भागातील जनता करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या