
ज्वारीच्या पिकाला पाणी देत असताना अचनाक बिबट्याने वृध्दावर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याची घटना तालुक्यातील सोलेवाडी येथे गुरुवारी घडली आहे. विकास विठोबा झगडे (वय 60) असे बिबट्याने हल्ला केलेल्या वृध्दाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश धस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तालुक्यामध्ये आठवडाभरापासून बिटयाने धुमाकुळ घातला असून बिबट्याच्या हल्ल्याची तालुक्यातील ही सहावी घटना आहे.
सोलेवाडी येथे शेतकरी विकास विठोबा झगडे शेतातील ज्वारीच्या पिकाला पाणी देत होते. पाणी देत असताना ते खाली वाकले असता अचानक बिबटयाने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या कमरेला, मांडीला आणि उजव्या हातास जखम झाली आहे. विकास झगडे यांचा मुलगा आशिष झगडे त्यावेळी तेथेच असल्याने त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने पळ काढला.
विकास झगडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेत तालुक्यातील तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. तालुक्यामध्ये बिबटयाची दहशत निर्माण झाली असून नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी वनविभागचे अधिकारी, कर्मचारी यांचे पथक दाखल झाले असून ज्वारीच्या पिकामध्ये शोध मोहिम सुरु केली आहे. सुरुवातीस घटना झालेल्या पारगाव (जो.) या गावापासून सोलेवाडी हे गाव नऊ किलोमीटर अंतरावर आहे. तर आष्टीपासुन पाच किलोमीटरवर आहे. आष्टीच्या जवळच्या परिसरात बिबटया आल्याचे समजताच आता शहारातील नागरीकांचीही धास्ती वाढली आहे.





























































