बिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी। कोपरगांव

तालुक्यातील जेऊरकुंभारी येथे शुक्रवारी रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यात तरुण जखमी झाला आहे. दादासाहेब सखाहरी चव्हाण असे त्याचे नाव आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरीत पिंजरे लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

दादासाहेब शुक्रवारी रात्री डेअरीत दूध जमा करुन घराकडे निघाला होता. त्याचवेळी सावळीविहीर जेऊरकुभांरी रोडवर बिबट्या दबा धरून बसला होता. अंधार असल्याने झुडुपात लपलेला बिबट्या दादासाहेबाला दिसला नाही. दादासाहेब जवळ येताच बिबट्याने त्याच्यावर झडप मारली. समोर साक्षात मृत्यू दिसत असतानाही दादासाहेबाने हिंमत दाखवली व तो मदतीसाठी आरडाओरडा करु लागला.त्याचबरोबर त्याने मोटारसायकल सुरू केली. या आवाजाने वस्तीजवळील लोकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. हे पाहताच बिबटयाने झुडुपात धूम ठोकली. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी हातात लाठ्या काठ्या व टॉर्च घेऊन लोक झुडुपात शिरले.पण बिबट्या पळाला होता. यादरम्यान, दादासाहेबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या पाठीला, हाताला व डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती सुधारत आहेत.

दरम्यान,नागरिकांनी दूरध्वनीवरून वनविभागाचे अधिकारी जाधव यांना याबद्दल माहीती दिली.त्यानंतर जाधव व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सर्व परिस्थितीची पाहाणी केली . तेव्हा भिमराज वक्ते व ग्रामस्थांनी घटना घडलेल्या परिसरात अनेक शेततळी व घनदाट झाडी असल्याने पाणी व भक्ष्याच्या शोधात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढल्याचे वनअधिकाऱ्यांना सांगितले. तसेच याभागात त्वरीत पिंजरा लावण्याची मागणी केली. तेव्हा वनविभागाच्या वतीने पिंजरा लावला जाईल असे आश्वासन जाधव यांनी दिले व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशाराही दिला.