बिबट्याचा मुर्शतपुरात धुमाकूळ, गोठ्यातील कालवड मारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथे बिबट्याने चांगलाचा धुमाकूळ घातला आहे. तसेच साहेबराव पुंजाजी शिंदे यांच्या वस्तीवरच्या गाईच्या गोठ्यात बांधलेल्या कालवडीचा बिबट्याने फडशा पाडला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. मात्र बिबट्याच्या संचाराने मुर्शतपूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणीही घाबरलेल्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

बुधवारी पहाटे चार वाजता साहेबराव शिंदे यांच्या गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्या गोठ्यात शिरल्यानंतर जनावरांनी हंबरडा फोडला. जनावरे ओरडण्याचा आवाज आल्याने शिंदे कुटुंबीयांनी गोठ्याकडे धाव घेतली. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मदतीने काठी व दगडाच्या सहाय्याने बिबट्याला तिथून पळवून लावले.

मुर्शतपूरमध्ये शिंदे वस्तीवर बिबट्या शिरल्याची ही पहिलीच घटना असून नागरिक भयभीत झाले होते. ही बातमी वन विभागाच्या अधिकार्‍यांना कळवल्यानंतर जनावरांना लागलेली नखे, बिबट्याचे दात तसेच बाजूला असलेले बिबट्याच्या पायचे ठसे याची त्यांनी पाहणी केली.

मुर्शतपूर शिंदे वस्तीवर दाठ लोकवस्ती असून प्राणी पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्या पुन्हा हल्ला करण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वन विभागाने यात लक्ष घालून ताबडतोब या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी साहेबराव शिंदे यांनी केली आहे. नागरिकांना दक्ष राहण्याचे सांगतानाच सुरक्षेच्या दृष्टीने पिंजरा बसवणार असल्याचे वन क्षेत्रपाल एस.एम जाधव यांनी सांगितले.