मुरबाडमधील काट्याच्या वाडीत बिबट्या आला रे… वनखाते म्हणते फटाके फोडा!

leopard

सामना ऑनलाईन । मुरबाड

बिबट्या आला रे… अशी अफवा जरी पसरली तरी नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेली शिंगापूर-काट्याची वाडी हादरून जाते. या बिबट्याच्या धसक्याने वाडीत राहणाऱया आदिवासींची पुरती झोप उडाली आहे. एक वर्षापूर्वी एका आदिवासीच्या पत्नीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार मारले. आता त्याच आदिवासीच्या घरासमोरील बकऱ्या बिबटय़ाने शनिवारी रात्री फस्त केल्या. आधी बायको गेली आणि आता बकरीही. या बिबटय़ाला पकडण्यास वनखात्याला अपयश आल्याने पाचशे आदिवासींचा जीव टांगणीला लागला आहे.

काटय़ाची वाडी हा भाग भिमाशंकर अभयारण्याच्या हद्दीत येतो. नव्वद टक्के येथील परिसर डोंगराळ भागात असल्याने स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काटय़ाची वाडी ही जेमतेम 400 ते 500 आदिवासींची वस्ती. उपजीविकेचे साधन नाही. जंगलात मध गोळा करणे, लाकूडफाटा जमा करणे यावरच त्यांची गुजराण होते. या वाडीतील खंडू वरे हा आदिवासीदेखील आपल्या कुटुंबाचे कसेबसे पोट भरायचा.

गेल्या वर्षी त्याची पत्नी मीरा ही शेतात काम करत असताना बिबटय़ाने तिच्यावर हल्ला केला आणि ठार मारले. या दुःखातून सावरत नाही तोच शनिवारी रात्री बिबटय़ाने काटय़ाच्या वाडीत घुसखोरी केली आणि घराबाहेर बांधून ठेवलेल्या बकरीवरच हल्ला केला. खंडू वरे हा आवाजाने जागा झाला व त्याने आरडाओरडा केला पण तोपर्यंत बकरीला ठार मारून बिबटय़ा पसार झाला होता.

वनखाते म्हणते फटाके फोडा!

काटय़ाच्या वाडीतील बिबटय़ाची दहशत अजून कायम असल्याने वनखात्याच्या अधिकाऱयांनी कोणतीही हालचाल केलेली नाही. आदिवासींना “तुम्ही फक्त फटाके फोडत रहा… बिबटय़ा पळून जाईल’’ असा सल्ला दिला आहे. गेल्या 15 दिवसांपासून फटाके फोडूनही बिबटय़ा वाडीच्या परिसरातच ठाण मांडून असल्याचे कालच्या घटनेतून दिसून आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या