बिबट्याची नखे काढून मृत बिबट्या जमिनीत पुरला; तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिबट्याची नखे काढून त्या मृत बिबट्याला जमिनीत पुरण्याचा धक्कादायक प्रकार वनविभागाने उघडकीस आणला आहे. लांजा तालुक्यातील वेरवली येथे ही घटना घडली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे बिबट्याची नखे सापडली आहेत.

लांजा तालुक्यातील वेरवली येथे जमिनीत मृत बिबट्या पुरल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. वनविभागाच्या परिक्षेत्रीय अधिकारी प्रियांका लगड यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्यानंतर वनविभागाने जमीन उकरून मृत बिबट्या बाहेर काढला. त्याबिबट्याची नखं गायब होती त्यामुळे वनविभागाने दिनेश पवार, रमेश साळसकर व शंकर देवळेकर तिघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. जमिनीत पुरण्यात आलेला बिबट्या 2 ते 3 दिवसांपूर्वी मृत पावल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याची नखे काढून तो जयश्री साळसकर यांच्या जमिनीत पुरला होता.