सिन्नरमध्ये झुंज करणारे बिबटे चढले नारळाच्या झाडावर

झुंज करणाऱया दोन बिबटय़ांनी वायूवेगाने चक्क नारळाच्या झाडावरच चढाई केल्याची घटना सिन्नरजवळील सांगवी येथे घडली. काळजाचा थरकाप उडविणारा या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने रहिवाशी आणि वनखाते सतर्क झाले आहे.

सिन्नरच्या सांगवी शिवारात रविवारी सकाळी सातच्या सुमारास शांताराम विठोबा घुमरे यांच्या शेतात दोन बिबटय़ांच्या डरकाळ्यांचा आवाज येत होता. यामुळे या वस्तीवरील काही तरुण मक्याच्या शेताजवळ थांबले असता त्यांना बांधावरील नारळाच्या झावळ्यांमध्ये एका बिबटय़ाची हालचाल दिसली. तेव्हा त्यांनी मोबाईल कॅमेऱयातून व्हिडीओ शूटिंग केले. काही वेळात झावळ्यातून बाहेर येत एक बिबटय़ा खाली उतरत असतानाच मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या दुसऱया बिबटय़ाने त्याच्यावर झडप घातली. दोन्हीही बिबटे वायूवेगाने उंच अशा नारळाच्या झाडावर सरसर चढून गेले अन् क्षणार्धात खाली कोसळले. तेथून त्यांनी धूम ठोकली. हा व्हिडीओ व्हायरल होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली, ते सतर्क झाले आहेत. वनविभागानेही ट्रप कॅमेरे लावले आहेत.