
हिमायतनगर तालुक्यातील पवना तांडा येथे काल सायंकाळी गायरानात एका बिबट्याचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मृत बिबट्याची विल्हेवाट वन विभागाने गुपचूप लावल्याने वन विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
शनिवारी सायंकाळी पवना तांडा येथील गायरान शिवारात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती एका शेतकऱ्याने वन विभागाला दिल्यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा बिबट्या कधी मरून पडला, याची कुणकुणही वन विभागाला लागली नव्हती. बिबट्या हा जवळपास दहा ते पंधरा दिवसांपासून मरण पावल्याचा अंदाज त्याला लागलेल्या अळ्या व कुजलेल्या अवस्थेवरून व्यक्त करण्यात येत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील नामशेष होत असलेले जंगल व वन विभागाच्या निष्काळजीपणाने वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील व शेतशिवारातील शिरकाव यामुळे हरीण, नीळ, रानडुक्कर, मोर, ससा, रोही आदी प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. काल चक्क बिबट्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी वन्यप्रेमी नागरिकांमधून केली जात आहे.






























































