
पावसावर शेती, पाचवीला पुजलेला दुष्काळ, विहिरीला थोडेफार पाणी आले, तर त्या पाण्यावर एखादे पीक घेण्याची किमया साधणारा राहाता तालुक्यातील जिरायती टापू आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. तालुक्यातील द्राक्षबागायदार वेगळ्याच अडचणीत आले असून, तोडणीअभावी त्यांची पिके आता कोमेजू लागली आहेत. याचे कारण म्हणजे बिबटय़ाचा वावर! बिबटय़ाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यासही धजावत नसल्याने पिकांना त्याचा फटका बसत आहे.
राहाता तालुक्यातील जिरायत टापूत दोन दिवसांपूर्वी पिंप्री लौकी, काकडी शिवेवरील शेतात पाणी भरत असलेल्या वृद्ध शेतकऱयावर बिबटय़ाने हल्ला केला, त्यांना जखमी केले. त्या आगोदर पिंप्रीलोकई भागातील अनेक वस्त्यांवरील कुत्री या बिबटय़ाने फस्त केली आहेत. त्यामुळे जिरायती टापू बिबटय़ाच्या वावराने धास्तावला आहे. त्या शेतकऱयावर हल्ला झाल्यापासून शेतातील उभ्या पिकात बिबटय़ा दबा धरून बसत असून, तो हल्ला करत असल्याची शेतकऱयांची धारणा झाली आहे. अनेकांना त्याने दर्शनही दिले आहे. हा एकच बिबटय़ा की आणखी त्याला कोणी जोडी आहे. हे मात्र कुणालाही सांगता येत नाही. मात्र, पिंप्रीलोकई, केलवड, आडगावचा पश्चिम भाग तसेच शेजारील कोपरगाव तालुक्यातील काकडी भागात प्रचंड दहशत पसरली आहे. शेजारी शिर्डी विमानतळ आहे. भिंतीमुळे बिबटय़ा विमानतळाच्या आत प्रवेश करू शकणार नाही; परंतु या भिंतीपासून काही अंतरावर मात्र प्रचंड दहशत पसरली आहे.
या जिरायती टापूत जेमतेम पाण्यावर पिके घेतली जातात. त्यातच वीज वितरण कंपनी शेतीसाठी रात्री वीज देते, यामुळे शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडले आहेत. पिके उभी आहेत. मात्र, बिबटय़ाच्या भीतीने शेतकऱयांनी रात्री पिकांना पाणी देणे थांबविले आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.
पिंप्रीलोकई, केलवड आणि आडगाव येथील शेतकरी बिबटय़ाच्या मुक्त संचारामुळे धास्तावले आहेत. आपल्या शेतात सहा एकर क्षेत्रावरील द्राक्षपीक धोक्यात आले आहे. शेतातील द्राक्षे परिपक्व होत आली आहेत. या द्राक्षांची काढणी महिन्यावर आली आहे. मका, हरभरा, कांदे ही पिके शेतात उभी आहेत. रात्री आम्हाला शेतीसाठी वीज मिळते; पण बिबटय़ाच्या धास्तीने शेतात पाणी भरण्यास जाता येत नाही. परिणामी हातातोंडाशी आलेला घास अडचणीत येत असल्याने मोठा मनस्ताप होत आहे. महावितरण कंपनीने दिवसा वीज द्यावी, अशी अग्रही मागणी त्यांनी केली आहे. या बिबटय़ाला वनविभागाने पिंजरा लावून जेरबंद करावे, अन्यथा या भागातील पिकांचे, शेतकऱयांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच ग्रामस्थांमध्येही त्या शेतकऱयावर हल्ला केल्यामुळे प्रचंड दहशत पसरली आहे.



























































