नगरमध्ये बिबट्याकडून हरिणाची शिकार, परिसरात दहशतीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात पहाटेच्या सुमारास एक हरीण मृतावस्थेत आढळला. हे हरिण अडीच वर्षाचे मादी जातीचे गर्भवती असल्याचे समोर आले आहे. सदर हरणाची बिबट्याने शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज वन खात्याने व्यक्त केला आहे.

शहरी वसाहतीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून वन विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे. या भागात राहणाऱ्या नागरीकांनी घटनेची माहिती पालिकेसह वन विभागास दिली. काही वेळातच संबधित कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. नगर पालिकेच्या वाहनातून सदर हरिण जनावरांच्या दवाखान्यात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले.

शहराला लागून शेती महामंडळाची टिळकनगर मळ्याची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. या ठिकाणी नेहमी हरणांचा वावर सुरु असतो. तसेच शहर जवळील दुधाळ वस्ती, खंडागळे वस्ती, बेलापूर ते दिघी रस्ता व बेलापूर परिसरात अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर आहे. निवासी भागात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.