
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बिबट्याने बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. बिबट्यांची वाढती संख्या आणि नागरी भागातील मुक्त वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत वाढत आहे. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या पशुधनावरील वाढलेल्या हल्ल्यांमुळे बळीराजा चिंतेत असून, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मगाणी स्थानिक करत आहेत.
काळेवाडी-दरेकरवाडी, घोडेगाव परिसर, चिंचोली, पळसटिका, परांडा, जांभोरी, धोंडमाळ, तळेघर, काळवाडी, नारोडी, कोळवाडी-कोटमदरा, फुलवडे, ढाकाळे, शिंदेवाडी आदी गावांसह वाड्यावस्त्यांवर बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरले आहेत. बिबट्या दिवसाढवळ्या दर्शन देऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जनावरांवर हल्ला केल्यानंतर शेतकरी वन विभागाला माहिती देतात. त्यानंतर कर्मचारी पंचनामा करतात. मात्र, बिबट्याला जेरबंद करण्यात ते अपयशी ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कोलदरा, गोनवडी, चिंचोली, चास, गिरवली, कडेवाडी, डिंभे ते लांडेवाडी या भागादरम्यान ऊस क्षेत्र असल्याने बिबट्यांचा वावर आढळत आहे. डिंभे पाणलोट क्षेत्रामधील गावे, डिंभे ते श्रीक्षेत्र भीमाशंकर या भागामध्ये ऊसबहुल क्षेत्र नसतानासुध्दा बिबट्यांचा वावर वाढत आहे. मात्र, वन विभागाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ कैलास काळे, सावता झोडगे, विनायक काळे यांनी केली आहे.