शिरूर पश्चिम भागात बिबटयांचे पाळीव जनावरांवर पुन्हा हल्ले सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरुर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास येथील दाभाडे वस्तीवरील बबन बापू दाभाडे यांच्या घरालगतच्या शेतात बांधलेल्या एका २० वर्षाच्या घोडीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घोडी ठार झाली आहे. बैलगाडा शर्यतीत बैलांच्या पुढे पळणारी घाटाची राणी म्हणून ही घोडी परिसरात प्रसिद्ध होती. पण बैलगाडा शर्यती बंद झाल्या तरी दाभाडे कुटुंब या घोडीस जीवापाड जपत होते. आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने या घोडीस ठार मारल्याने दाभाडे यांचे सुमारे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचे ताराबाई दाभाडे यांनी सांगितले. तर किमान दोन बिबटे असण्याची शक्यता बबन दाभाडे यांनी व्यक्त केली आहे. या घोडीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कवठे येमाई परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिक सांगत असून या बाबत दक्षता म्हणून वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे. मागील ४ महिन्यापूर्वी येथील नाना दाभाडे यांचा गोऱ्हा व एका मेंढपाळाच्या घोडीवर हल्ला करीत बिबट्याने त्यांना ठार केले होते. कवठे येमाई परिसरात अनेक पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दहशतीने शेतक-यांना दिवसाही शेतीतील कामे करणे आता भीतीदायक वाटू लागले आहे. बिबट्याच्या हल्ल्याने पाळीव प्राण्यांना नाहक जीव गमवावे लागत असल्याने वन विभागाने बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी युद्धपातळीवर उपाय योजना करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या बाबत शिरूरचे मुख्य वन अधिकारी तुषार ढमढेरे यांना कळविण्यात आले असून वनविभागाचे प्रवीण क्षीरसागर यांनी घटनास्थळी तातडीने येऊन पंचनामा करणार असल्याचे सांगितले. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या संबंधित शेतक-यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळेल असेही ते म्हणाले.