
दोन दिवसांपूर्वी दिंडोरीच्या जाधव वस्तीवर बिबटय़ाने बालकाचा बळी घेतला, त्यानंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चोवीस तासातच बिबटय़ा अडकला. जाधव वस्तीवरील रुद्र जाधव (5) हा शनिवारी रात्री आजोबांसोबत घराबाहेर उभा असताना बिबटय़ाने हल्ला चढवला, त्याला जबडय़ात धरून ओढत नेले. नंतर शेतात त्याचा मृतदेह सापडला. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता, तसेच पथके गस्त घालत होती. रविवारी रात्री पिंजऱ्यात बिबटय़ा अडकला. ही तीन वर्षे वयाची मादी आहे. याच भागात ग्रामस्थांना काल दोन बिबटे दिसले. त्यामुळे पिंजरा लावून त्यांनाही पकडावे, अशी मागणी रमेश बोरस्ते, नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.





























































