
सामना प्रतिनिधी । मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली खरी, पण फटाकेविक्रीच्या अटीशर्तींमुळे तसेच ग्राहकांवरही फटाके वाजवताना वेळेचे बंधन घातल्यामुळे फटाकेवाल्यांचाच आवाज बंद झाला आहे. फटाक्यांना बाजारात मोठय़ा प्रमाणावर मागणीच उरलेली नाही. त्यामुळे फटाकेविक्रेत्यांनी यंदा केवळ 50 टक्केच माल गोडाऊनमध्ये भरला आहे.
मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली असली तरी गेल्या तीन वर्षांत मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांची मागणी कमी झाली आहे. इतकेच नव्हे तर एकंदर फटाक्यांची मागणीही तब्बल 30 टक्क्यांनी घटली आहे. केवळ रंग आणि प्रकाशमान होणाऱया फटाक्यांचीच ग्राहक खरेदी करत असल्याचे फटाकेविक्रेत्यांनी सांगितले.
दिवाळी आणि फटाक्यांचे अतूट नाते
यंदाची दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी झाली असे कधी ऐकले आहे का? त्यामुळे फटाकेविक्री दरवर्षी होतेच, परंतु गेल्या तीन वर्षांत ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. आवाजाच्या फटाक्यांवर दरवर्षीच बंदी घातली जाते. त्यामुळे यंदा आम्ही आवाजाचे फटाके भरलेलेच नाहीत.
-अब्दुल्ला गिया (इसाभाई मुसाभाई फायर वर्क्स)
फटाके नाही तर दिवाळी कसली?
दिवाळीत फटाके नाहीत तर ती दिवाळी कसली? त्यामुळे फटाक्यांवर सरसकट बंदी घातलेली नाही हे चांगले झाले. घातक अशा मोठय़ा फटाक्यांवर मात्र बंदीच हवी. – रघुनाथ बाणे (घाटकोपर)
ग्राहकांमध्येही ध्वनिप्रदूषणाबद्दल जनजागृती
ग्राहकांमध्येही ध्वनिप्रदूषणाबद्दल जनजागृती आहे, मात्र गेल्या तीन वर्षांत फटाक्याची मागणीही चांगलीच घटली आहे. त्यामुळे यंदा 50 टक्केच माल भरला. – राहुल खामकर (एस. पी .खामकर ऍण्ड सन्स, लालबाग)
सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्यच
सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय योग्यच आहे. आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात रुग्णालये मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यामुळे आम्ही दरवर्षी पाऊस, भुईचक्र, फुलबाजे असेच फटाके खरेदी करतो. – सुनील टिकलेकर (परळ)



























































