पंपोरमध्ये चकमक, LeT चा टॉपचा कमांडर उमर मुश्ताकसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा

फाईल फोटो

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडत आहेत. शनिवारीही पंपोरमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जवानांनी मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर उमर मुश्ताक आणि शाहिद खुर्शीद यांचाही समावेश आहे.

कश्मीर खोऱ्यात गेल्या दोन आठवड्यात 9 जवान शहीद झाले. त्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील मोहीम जवानांनी आणखी तीव्र केली. गेल्या 24 तासामध्ये खोऱ्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पंपोरमध्ये ज्या दहशतवाद्यांना जवनांनी यमसदनी धाडले त्यांनी जम्मू-कश्मीरमधील नागरिकांची हत्या केली होती.

पंपोरमध्ये जवानांनी ठार केलेला लश्कर-ए-तोयबाचा कमांडर उमर मुश्ताक हा दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येमध्ये सहभागी होता. तर शाहिद खुर्शीद याने खोऱ्यातील सामान्य नागरिकांना निशाणा बनवला होता. याचा बदला घेत सुरक्षा जवानांनी दोघांनाही ठार केले. तसेच शाहिर बशीर या दहशतवाद्याचाही जवांनांनी खात्मा केला.

दरम्यान, कश्मीरमध्ये सामान्य नागरिकांना दहशतवाद्यांनी निशाणा बनवल्यानंतर सुरक्षा जवानांनी 9 एन्काउंटरमध्ये 13 दहशतवाद्यांना ठार केले आहे. गेल्या 24 तासात तीन दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहबिती आयजीपी विजय कुमार यांनी दिली.