‘मराठा’ आरक्षणाच्या आनंदात सामील होऊया – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘अखेर मराठा आरक्षण लागू झाले. राज्यात दिवाळी, जल्लोषाचे वातावरण आहे. आम्ही स्वतः या आनंदात सहभागी आहोत. पण हा दिवस उजाडण्यासाठी ज्यांनी रक्त सांडले, बलिदान दिले त्यांचेही स्मरण आम्ही करीत आहोत,’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मराठा समाजास 16 टक्के आरक्षण लागू केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सरकारचे अभिनंदन केले. त्याच वेळी विरोधकांना टोला लावत सांगितले, ‘शिवसेना अजून सरकारमध्ये का? या प्रश्नाचे उत्तर आज लागू झालेल्या ‘मराठा’ आरक्षणात आहे. सरकारमध्ये राहून आम्ही कोकणची वाट लावणारा ‘नाणार’ घालवला व आता मराठा आरक्षणही लागू करून घेतले. 288 आमदारांनी या निर्णयास पाठिंबा दिला. एकमताने घेतलेल्या निर्णयाचे राजकीय श्रेय कोणी घेऊ नये. विरोधक जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी आरक्षण लागू करून मराठा समाजास न्याय का दिला नाही, हा प्रश्न तरीही आहेच!

मराठा समाज मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरला. पण शिस्त बिघडू दिली नाही हे महत्त्वाचे. कधीकाळी आर्थिक, राजकीयदृष्ट्या सक्षम असलेल्या मराठा समाजावर न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हा गेल्या 70 वर्षांतील राजकीय व्यवस्थेचा पराभव आहे. पण शेवटी ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड मानून ‘मराठा’ आरक्षण जल्लोषात सामील होऊया, असेही शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले.