मॉब लिंचिंगविरोधात सेलिब्रेटींत लेटरवॉर, 49 मान्यवरांच्या पत्राला 61 जणांचे उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

देशभरात गेल्या काही दिवसांपासून मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. याबाबत विविध क्षेत्रांतील 49 मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त करत रामाच्या नावावर होणार्‍या हत्या थांबवा, अशी मागणी केली होती. या पत्राला 61 सेलिब्रेटींनी खुले पत्र लिहीत उत्तर दिले आहे. देशात एवढय़ा निवडक घटना घडत असताना काही मोजक्याच प्रकरणांचा निषेध आणि विरोध का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मॉब लिंचिंगसारख्या घटना आणि श्रीरामाचे नाव घेत होत असलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून प्रतिभावंतांत दोन गट पडले आहेत. अभिनेत्री कंगना राणौत, गीतकार प्रसून जोशी, शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह, दिग्दर्शक मधुर भंडारकर, विवेक अग्निहोत्री आदी दिग्गजांनी काही निवडक घटनांबद्दल समाजातील मान्यवरांकडून चिंता व्यक्त करण्यात येत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

ज्यावेळी नक्षलवादी गरीब आदिवासींची हत्या करतात तेव्हा हे लोक शांत का राहतात? कश्मीरमध्ये फुटीरतावादी शाळा बंद केल्या तेव्हा हे लोक कुठे गेले होते? जेएनयूमध्ये देशाचे तुकडे होतील अशी घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी मत का नाही व्यक्त केले, अशी विचारणा झुंडबळीच्या विरोधात पंतप्रधानांना पत्र लिहून आवाज उठविणार्‍यांना 61 सेलिब्रेटींनी केली आहे.

टीका करण्याचे स्वातंत्र्य

या सरकारच्या काळात लोकांना इतके स्वातंत्र्य मिळाले की लोक सरकारवर कोणत्याही पातळीला जाऊन टीका करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ‘सब का साथ-सब का विकास’चा मंत्र दिला. मॉब लिंचिंग एक समस्या आहे. त्याबाबत सरकार यावर कठोर पावले उचलत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.