एलएचबी गाड्यांची नवी रचना ठरली डोकेदुखी, कल्याणमध्ये होते सर्वाधिक ‘चेन पुलिंग’

818

लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या सुरक्षा साखळी खेचल्याने या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. उन्हाळी सुट्यांच्या गर्दीमुळे प्रवासी मागे राहिल्याने अशा सुरक्षा चेन खेचण्याचे प्रकार वाढत असून नव्या एलएचबी डब्यांची लांबी जादा असल्यानेही प्रवाशांचे अंदाज चुकत असून त्यामुळेही गाड्यांमध्ये ऐनवेळी चढता येत नसल्यानेही गाड्यांचे चेन पुलिंग होत आहेत. कल्याण टर्मिनसमध्ये काही गाड्यांचे थांबे पाच मिनिटांऐवजी तीन मिनिटे केल्याने सर्वाधिक ‘चेन पुलिंग’ होत असल्याचे उघड झाले आहे.

एप्रिल ते जानेवारी 2018-19 दरम्यान सुरक्षा चेन खेचण्याच्या 1068 घटना घडल्या आहेत. 2019-20मध्ये याच कालावधीत अशा घटनांत वाढ होऊन 1434 प्रकरणे नोंदली गेली. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार 56 घटना याही सुरक्षा साखळी अपघाताने चुकीने ओढली गेल्याने म्हणजे त्यावर प्रवाशांनी आपल्या बॅग अडकवल्याने घडल्याचे निष्पन्न झाले आहे. 106 घटना तांत्रिक कारणाने घडल्या असून त्याही प्रवाशांनी चुकीने अलार्म चेन ओढल्याने गाडीला ब्रेक लागले आहेत.

सुरक्षा साखळी ओढल्याच्या 556 प्रकरणांत अज्ञात कारणांसारखी चेन खेचल्याचे उघडकीस आले आहे. हे प्रकार दोन स्थानकांच्या दरम्यान किंवा मिड सेक्शनमध्ये टीसी किंवा आरपीएफ चेकिंगसाठी गाडीत येत असताना घडले आहेत.

अलार्म चेन पुलिंगचा (एसीपी) अभ्यास करता गाड्यांना असणार्‍या प्रचंड गर्दीमुळे 120 घटना घडल्या आहेत. यात प्रवासी फलाटावर मागे राहिल्याने चेन खेचल्याच्या 163 घटना आहेत. 105 घटना नातलग किंवा मित्राला गाडी वेळेत पकडता न आल्याने चेन खेचल्याच्या घटना आहेत. यात कल्याण टर्मिनसला काही गाड्यांचा थांबा पाच मिनिटांऐवजी अवघा तीन मिनिटांचा असल्यानेही कल्याण एसीपीचे प्रमाण मोठे असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कल्याण टर्मिनसमध्ये सर्वाधिक चेन पुलिंगच्या घटना (328) घडल्या असून त्यानंतर ठाणे (154) घटना घडल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने केलेल्या अभ्यासानुसार मध्य रेल्वेच्या 46 ट्रेनमध्ये सर्वाधिक चेन पुलिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यात उत्तरेला जाणार्‍या गाड्यांची संख्या अधिक आहे. त्यात पवन एक्सप्रेस, कामायनी आणि छपरा एक्सप्रेसचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक ड्युटीसाठी अधिक कोच वापरले गेल्याने कोचची टंचाई निर्माण झाल्याने डबे वाढवता न आल्याने उत्तरेकडे जाणार्‍या गाड्यांना प्रचंड गर्दी होती. त्यामुळेही अशा प्रकारांमध्ये वाढ झाली होती.

प्रवाशांनी सुरक्षा चेनलाच बॅग अडकवल्याने गाड्या होतायत लेट  

रेल्वेने आधुनिकीकरणासाठी अपघातरोधक असे नवे एलएचबी डबे व्यवहारात आणले खरे; परंतु हे डबे आता रेल्वे अधिकार्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या डब्यांची लांबी पारंपरिक डब्यांपेक्षा जादा असल्याने प्रवाशांचा गाडी पकडताना अंदाज तर चुकत आहेच, शिवाय या डब्यांच्या ‘सुरक्षा चेन’चा आकार काहीसा वेगळा असल्याने प्रवासी त्यावर आपल्या बॅगा तसेच वस्तू ठेवत असल्याने ‘अलार्म चेन पुलिंग’ झाल्याने गाड्यांना ब्रेक लागून मध्य रेल्वेच्या 34 टक्के मेल-एक्सप्रेस लेट होत असल्याचे उघडकीस आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या