
मुंबई–पुणे धावणार्या ऐतिहासिक ‘डेक्कन क्वीन’ला अत्याधुनिक ‘एलएचबी’कोचची जोड देण्यात येणार आहे. तिची खासियत असलेली ‘डायनिंग कार’देखील एलएचबी तंत्रज्ञानानेच तयार करण्यात यावी अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे मध्य रेल्वेने केली आहे. तसेच या गाडीला एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी विमानप्रवासाप्रमाणे आसने असणारा ‘अनुभूती’ डबाही जोडण्यात येणार आहे. शिवाय ही गाडी आता 17 डब्यांऐवजी 24 डब्यांची होणार आहे.
मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणार्या पहिल्या लक्झरीयस ट्रेन ‘डेक्कन क्वीन’ला बदलत्या काळाप्रमाणे आधुनिक जर्मन तंत्रज्ञानाचे ‘लिंके हॉफमन बुश’ अर्थात ‘एलएचबी’डबे जोडण्यात येणार आहेत. या गाडीची खासियत असलेली ‘डायनिंग कार’(फिरते उपाहारगृह) एलएचबी तंत्रज्ञानात तयार नव्हते. मात्र प्रवाशांच्या मागणीवरून या गाडीची डायनिंग कार कायम ठेवत तिचे रूपांतर ‘एलएचबी’ तंत्रज्ञानाच्या डब्यांत करण्याची मागणी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाला केली आहे. या गाडीची ओळख असलेला पारंपरिक निळा आणि पांढरा रंगदेखील कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
अशा आहेत ‘अनुभूती’डब्यातील सुविधा
- सेन्सरयुक्त पाण्याचे नळ आणि बायोटॉयलेट
- ऍण्टी ग्राफिटी पद्धतीने रंग
- जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित वेग, येणारे स्थानक यांचे ‘रिअलटाइम’ अपडेट
- यूएसबी पोर्ट असलेली नऊ इंच एलसीडी स्क्रीन, हेडफोन आणि एसी जॅक
- वैयक्तिक कॉल अटेंडरची सुविधा
- वैयक्तिक हेड लॅम्प आणि स्नॅक्स टेबल
- आरामदायी आसने आणि पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा
‘अनुभूती’च्या आसनांना ‘लेगरेस्ट’ची सोय
डेक्कन क्वीनला एक्झिक्युटिव्ह क्लासचा ‘अनुभूती’ कोच जोडण्यात येणार आहे. ‘अनुभूती’च्या एका कोचमध्ये 56 आसने असून ती अत्यंत आरामदायी आहेत. ‘टू बाय टू’ अशी आसनांची रचना असून दोन आसनांमध्ये अंतरही अधिक असल्याने पायाजवळ मोकळी जागा आहे. तसेच लांबचा प्रवास करताना पायांना आराम देण्यासाठी आसनांना ‘लेगरेस्ट’ची सोय देण्यात आली आहे. या आसनांना वेलवेट फिनिशिंग टच देण्यात आला आहे. याशिवाय एंटरटेन्मेंटसाठी आसनांना ‘स्क्रिन’ लावलेले आहेत. यापूर्वी अनुभूतीचे आलिशान डबे शताब्दी गाडय़ांना जोडण्यात आले आहेत.

























































