पुस्तक स्पर्शाने वाचनप्रेमी सुखावले, वाचन प्रेरणा दिनी ग्रंथालयांची कवाडे खुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या ग्रंथालयांची कवाडे गुरुवारी खुली झाली आणि तमाम वाचनप्रेमींनी आनंद व्यक्त केला. पुस्तकांच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या वाचकांची पावले ग्रंथालये, वाचनालयांकडे वळली. त्यामुळे कपाटात बंद झालेल्या पुस्तकांनीही मोकळा श्वास घेतला. ग्रंथालय कर्मचाऱयांनी वाचकांचे मनापासून स्वागत केले. आजचा पहिला दिवस असल्याने ग्रंथालये दुपारी काही तासांसाठी सुरू राहिली. वाचकांची संख्या तुरळक होती, काही ग्रंथालयांमध्ये साफसफाई, सॅनिटायजेशनची कामे पूर्ण झाली नसल्याने तिथल्या वाचकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कित्येक महिने ग्रंथालये बंद असल्याने काही ठिकाणी साफसफाईची कामे पूर्ण झालेली नाही. ग्रंथालयांचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायजरचा वापर, पुस्तकांचे निर्जंतुकीकरण आदींचे नियोजनही काही ग्रंथालयांमध्ये पहिल्या दिवशी करण्यात आले. अनेक ग्रंथालयांचे आर्थिक नियोजनही कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर वाचकांकडून घ्यावयाचे शुल्क, विलंब शुल्क याबाबतही वाचनालयांच्या पदाधिकाऱयांमध्ये चर्चा झाली.

अनेक ग्रंथालयांनी सध्या कामकाजाच्या वेळा कमी केल्या आहेत. ग्रंथालयात काम करणाऱया कर्मचाऱ्यांचा लांबचा प्रवास लक्षात घेता हा निर्णय ग्रंथालय चालकांनी घेतला आहे.

देवाचं दर्शन झाल्याचा आनंद
देऊळ उघडल्यानंतर देवाचं दर्शन झाल्याची भावना वाचक सभासदांनी व्यक्त केली. सध्या बाहेर असलेली पुस्तकेच वाचकांना दिली जातील. ‘ऑन डिमांड’ पुस्तके दोन दिवसानंतरच मिळतील.
– अश्विनी फाटक,
ग्रंथपाल, दादर सार्वजनिक वाचनालय

दसऱ्यापर्यंत प्रतीक्षा
ग्रंथसंग्रहालय आज सुरू झाले तरी वाचकांना प्रत्यक्ष पुस्तकांची देवाणघेवाण करायला दसऱयापर्यंत वाट पहावी लागणार आहे. पेस्ट कंट्रोल अजून पूर्ण झालेले नाही. विजयादशमीच्या मुहूर्तावर सरस्वती पूजन करून संपूर्ण ग्रंथालय खुले होईल.
– कृष्णा नाईक, कार्यवाह,
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव शाखा