15 हजारांची लाच घेताना परवाना निरीक्षक ट्रॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कपडा धुलाई व कलरचा व्यवसाय करणाऱ्याकडे ट्रेड परवाना नसल्याचे सांगून कारवाई टाळण्यासाठी 20 हजारांची लाच मागून 15 हजार घेताना ऍण्टी करप्शन ब्युरोने पालिकेच्या दोघा परवाना निरीक्षकांना रंगेहाथ पकडले. वरिष्ठ परवाना निरीक्षक महेंद्र शिर्के (55) आणि निरीक्षक मिलिंद कीर (50) अशी त्या दोघांची नावे आहेत. जीवन (नाव बदलेले) यांचा कपड्यांना धुलाई व रंग देण्याचा व्यवसाय आहे.

पालिकेच्या एल वॉर्डमध्ये कार्यरत असलेले शिर्के आणि कीर हे 2 तारखेला जीवन यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी गेले व तुमच्याकडे ट्रेड परवाना नसल्याचे सांगून कारवाई होऊ द्यायची नसल्यास 20 हजार रुपये द्या, अशी मागणी केली. पण लाच द्यायची नसल्याने जीवन यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. दरम्यान, तडजोडीअंती 15 हजार देण्यावर सौदा ठरला. आज दोघांनाही 15 हजारांचा हफ्ता घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.