पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

बायको घरात चुलीवर स्वयंपाक करत असताना तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळणाऱ्या सारंग माणिक गरड या आरोपीला दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील अन्य तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

14 फेब्रुवारी 2016 रोजी शारदा सारंग गरड ही महिला घरात चुलीवर स्वयंपाक करीत असताना सारंग गरड याने घरातील रॉकेलची कॅन तिच्या अंगावर रॉकेल टाकले. त्यामुळे शारदा गंभीररित्या भाजल्याने तिचा मृत्यू झाला. पती सारंग कोणत्याही कारणावरुन आपल्याशी भांडत होता, असे मृत्यूपुर्वी शारदाने दिलेल्या जबानीत म्हटले होते. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी सारंग गरड, संगिता रामभाऊ गरड, जनाबाई गरड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उप निरीक्षक ए.एन. चिलांगे यांनी तपासानंतर जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. जिल्हा सत्र न्यायाधिश एन.बी. शिंदे यांच्या पीठासमोर या खटल्याची सुनावणी झाली. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून आरोपी सारंग गरडला दोषी ठरवत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शारदाचा मृत्यूपूर्व जवाब गाह्य धरण्यात येऊन आरोपी सारंग गरडला शिक्षा सुनावण्यात आली. मात्र उर्वरीत तीन आरोपीना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. सरकारच्या बाजुने जिल्हा सहाय्यक सरकारी वकील गजानन व्हि. घुगे यांनी बाजू मांडली.