एलआयसी प्रशासनाला लोकाधिकार समितीचा दणका, मराठीत सुरू होणार कॉल सेंटर

केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणाऱया आयुर्विमा महामंडळाने (एल.आय.सी) ग्राहकांच्या सेवेसाठी नुकतीच कॉल सेंटरची सुविधा सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार राज्यभाषेत कॉल सेंटर असणे गरजेचे आहे. मात्र त्यानंतरही एलआयसी प्रशासनाने याकडे कानाडोळा करीत इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषेत कॉल सेंटर सुरु केले. आज अखेर लोकाधिकार समिती महासंघाच्या दणक्यामुळे एलआयसी प्रशासनाने लवकरच मराठी कॉल सेंटर सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

एलआयसी प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच सर्व विमा ग्राहकांच्या सेवेसाठी कॉल सेंटरची सुविधा सुरु केली. राज्यात मराठी भाषेत कॉल सेंटर गरजेचे असताना ग्राहकांसाठी केवळ हिंदी व इंग्रजी भाषेचा पर्याय देण्यात आला. याची गंभीर दखल स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने घेतली.

यासंदर्भात महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या निर्देशावरून महासंघाचे चिटणीस वामन भोसले, एलआयसी समितीचे सरचिटणीस गोपाळ शेलार, महासंघाचे चिटणीस उमेश नाईक, उल्हास बिले, शरद एक्के, श्रीराम विश्वासराव यांच्यासह श्रीधर पार्टे, यतीन आमोणकर, मनोहर लाड, तुकाराम गायकवाड,जगदीश वेताळ, संतोष राऊत, संदीप शिंदे, विलास जाधव, सुधाकर नर या पदाधिकाऱयांनी आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरले.

आपली प्रतिक्रिया द्या