मीठ बेताने खा, अपाय टाळा

मिठाशिवाय जेवण रुचकर लागत नाही, मात्र असं असलं तरीही कोणताही पदार्थ चविष्ट होण्याकरिता आवश्यक तेवढच मीठ घालणं गरजेचं असतं. म्हणूनच ‘चिमूटभर मीठ’ किंवा ‘चवीनुसार मीठ’ , असा शब्दप्रयोग आपल्याकडे केला जातो. अनेकदा एखादा अन्नपदार्थ शिजल्यानंतर आपण चव घेऊन पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की, मीठ कमी पडलं आहे, म्हणून वरून मीठ घेण्याची सवय असते, मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आपल्याकडे हिंदुस्थानी आहार पद्धतीत चौरस आहाराला महत्त्व आहे, पण काही जण मात्र चटपटीत खाण्यावर भर देतात. काहींना लोणची, पापड असे पदार्थ जेवणासोबत लागतातच. या पदार्थांमध्ये मीठ जास्त प्रमाणात असते. त्यामुळे दररोज या पदार्थांचा आहारात समावेश करणे टाळावे.

शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणं हे मीठ जास्त झाल्यामुळे होतं. यामुळं मज्जातंतू आणि हृदयावर नकारात्मक परिणाम होतो. जास्त मिठामुळे रक्ताच्या गुठळ्या होणं, पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका येणं, रक्ताला प्रमाणाहून जास्त प्रवाहीपणा येणं, अशा गोष्टी होतात. मीठामध्ये मूलभूत घटक सोडियम असतो. सोडियमची मात्रा शरीरात जास्त झाली असता सोडिअमसोबत कॅल्शियमही शरीराबाहेर पडतं. यामुळे हाडांना ठिसूळपणा येणं यासारखे विकार होऊ शकतात. मीठ जास्त झाल्यामुळे शरीरावर महत्त्वाचा होणारा परिणाम म्हणजे उच्च रक्तदाब. ज्यांना उच्च रक्तदाब होतो त्यांना लो सोडियम मीठ किंवा अतिशय कमी मीठ असलेले पदार्थ खाण्याबद्दल सांगितलं जातं.

मिठाचे योग्य प्रमाण

जागतिक आरोग्यावर संघटनेने केलेल्या एका अभ्यासानुसार, हिंदुस्थानी लोक आहारात काही वेळा प्रमाणापेक्षा जास्त मिठाचा वापर करतात. आहारात मीठ कमी केल्यास ह्रदयरोगाचं प्रमाण 25 ते 30 टक्क्यांनी कमी होतं तसेच कमी मीठाचे पदार्थ खाल्ले असता किडनी निकामी होण्यापासून बचाव होतो. म्हणून प्रौढ व्यक्तीने केवळ 2 चमचे इतकंच मीठाचं सेवन करावं. मीठाचं अति सेवन अत्यंत गंभीर परिणाम करणारं ठरू शकतं.