
उत्तम आरोग्यासाठी शांत झोपही अत्यंत महत्त्वाची आहे. पुरेशी झोप न झाल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. दररोज 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात. आहाराचाही पुरेशा आणि शांत झोपेवर परिणाम होत असतो. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शांत झोप लागू शकते, तर काही पदार्थ झोपण्याआधी खाल्ल्याने झोप लागत नाही. त्यामुळे जाणून घेऊया झोपण्याआधी काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत सविस्तर माहिती.
झोपण्याआधी कोणते पदार्थ खाऊ नयेत ?
– रात्री झोपण्याआधी आईस्क्रीमचे सेवन करू नये. आईस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. याचा परिणाम झोपेवर परिणाम होतो. साखरेचा समावेश कॅफिनप्रमाणे उत्तेजक पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे झोपण्यापूर्वी 4 ते 6 तास आधी कॅफिनचे सेवन केल्याने झोप लागत नाही. याकरिता झोपण्याआधी कधीही आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. याव्यतिरिक्त रात्री झोपण्यापूर्वी पनीर, मसालेदार पदार्थ, केक, ग्रेव्ही असणारे पदार्थ खाऊ नयेत.
– रात्री झोपण्यापूर्वी बऱ्याच जणांना चहा पिण्याचीही सवय असते, मात्र चहामध्ये कॅफीन जास्त असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी आइस टी, कोल्ड्रींक्स चॉकलेट खाऊ नका.
‘हे’ पदार्थ न खाण्याचे कारण ?
अति मसालेदार आणि कॅफिनयुक्त पेय प्यायल्याने पुरेशी आणि गाढ झोप लागण्यास समस्या निर्माण होतात. शिवाय या पदार्थांमुळे पचनाचे विकारही उद्भवू शकतात. मसालेदार, ग्रेव्ही आणि तेलकट पदार्थांमुळे चयापचय क्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे नैसर्गिकरित्या झोप लागण्यास बराच वेळ लागू शकतो. पनीर असलेले पदार्थ झोपण्यापूर्वी खाल्ल्याने पोटावर सूज येण्याची शक्यता असते. यामुळे झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पनीरमध्ये टायरामाइन, अमीनो अॅसिड असते. यामुळे झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
झोपण्याआधी कोणत्या पदार्थांचे सेवन कराल?
– ज्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते अशा पदार्थांचे सेवन करा. यामुळे गाढ झोपेकरिता मदत होते. केळं, अक्रोड, बदाम, दूध या पदार्थांचे सेवन करा. यातील कॅल्शियममुळे शरीर आणि स्नायूंना आराम मिळतो. यातील ट्रिप्टोफॅन हार्मोन झोप लागण्याकरिता उपयुक्त आहेत.
– प्रत्येक व्यक्तिची झोपेची आवश्यकता वेगवेगळी असते. तरही सर्वसामान्यपणे सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे, तर लहान मुलांकरिता 13 तास झोपणे गरजेचे असते, शिवाय नवजात बाळांसाठी झोपेचा कालावधी 17 तासांचा असतो.



























































