जळगाव – अंगावर विज कोसळून दोन तरूण शेतकरी ठार

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा – आडगाव येथे आज सायंकाळी विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला. अडगाव – अंजनविहीरे रस्त्यावर असलेल्या टोळी शिवारात शेती काम करीत असलेले 2 तरूण शेतकऱ्यांचा अंगावर विज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. रविंद्र प्रभाकर महाजन व महेंद्र उखर्डु पाटील अशी मयतांची नावे आहेत.

आडगांव परिसरातील शेतीशिवारात रविंद्र प्रभाकर महाजन (23) व महेंद्र उखर्डु पाटील (26) रा. आडगाव हे अडगाव – अंजनविहीरे रस्त्यावर असलेल्या टोळी शिवारात शेतात शेती काम करीत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी रविंद्र महाजन व महेंद्र पाटील यांच्या अंगावर विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील शेतकऱ्यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी आडगाव पोलिस पाटील यांना माहिती दिली. या प्रकरणी आडगाव पोलीस पाटील नितीन भावसारे यांनी पोलिसांना माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या दोघा तरूण शेतकऱ्यांचा मृतदेह कासोदा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छदनासाठी नेण्यात आला. मृतदेह पाहुन कुटूंबियांनी एकच हंबरडा फोडला. या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत पाटील व शरद पाटील हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या